तुम्हाला थंड करुन घरात बसवायची आमच्यात ताकद – शिवेंद्रराजेंचा शशिकांत शिंदेंना इशारा

इम्तियाज मुजावर

• 04:34 AM • 09 Dec 2021

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर सुरु झालेलं राजकारण अद्याप काहीकेल्या शांत होताना दिसत नाहीये. शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. माझी शिफारस नसल्यामुळेच शिवेंद्रराजे यंदा चेअरमन झाले नाहीत अशी बोचरी टीका शशिकांत शिंदेंनी केली होती. शिंदेंच्या या टीकेला उत्तर देताना शिवेंद्रराजेंनी तुम्हाला थंड करुन घरात बसवायची आमच्यात ताकद असल्याचं म्हटलं […]

Mumbaitak
follow google news

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर सुरु झालेलं राजकारण अद्याप काहीकेल्या शांत होताना दिसत नाहीये. शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. माझी शिफारस नसल्यामुळेच शिवेंद्रराजे यंदा चेअरमन झाले नाहीत अशी बोचरी टीका शशिकांत शिंदेंनी केली होती.

हे वाचलं का?

शिंदेंच्या या टीकेला उत्तर देताना शिवेंद्रराजेंनी तुम्हाला थंड करुन घरात बसवायची आमच्यात ताकद असल्याचं म्हटलं आहे.

“शशिकांत शिंदेंनी माझ्यासाठी कधीच शिफारस केली नाही, आता त्यांचे सहानुभूती मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मी सुरुवातीला जेव्हा चेअरमन झालो तेव्हा त्या बैठकीत सुद्धा शशिकांत शिंदेंनी माझ्या चेअरमनपदाला विरोध दर्शवला होता. त्यामुळे त्यांनी माझी कधीच शिफारस केलेली नाही, ते धादांत खोटं बोलत आहेत. शिंदेंचा जावळीत पराभव झालाय ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्यातल्या गटबाजीमुळे त्यांचा पराभव झालाय”, असा टोला शिवेंद्रराजेंनी लगावला आहे.

माझी शिफारस नसल्यामुळेच शिवेंद्रराजे अध्यक्ष होऊ शकले नाहीत शशिकांत शिंदेंचा टोला

शशिकांत शिंदेंच्या चुकीच्या धोरणामुळे मतदार त्यांच्यासोबत राहिले नाही यात आमचा काय दोष आहे? जावळी तालुक्यात होणाऱ्या निवडणुका आम्ही यापुढेही ताकदीने लढणार आहोत. परंतू निवडणुकीच्या निमीत्ताने शिंदेंनी रान पेटवलं तर तुम्हाला थंड करुन घरी बसवायची आमच्यात ताकद आहे असाही इशारा शिवेंद्रराजेंनी दिला आहे.

याचसोबत आम्ही कोणत्या पक्षात जायचं हे तुम्ही सांगण्याची गरज नाही. आमचे कार्यकर्ते आणि मी हे पाहून घेऊ असंही शिवेंद्रराजे यावेळी म्हणाले.

त्यामुळे सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरुन दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये सुरु झालेलं राजकारण आता कुठलं वळणं घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सातारा जिल्हा बँक निवडणुक : कालपर्यंत शिवेंद्रराजेंची चर्चा, आज अध्यक्षपदाची माळ नितीन पाटलांच्या गळ्यात

    follow whatsapp