बैलगाडी शर्यती या फक्त बक्षिस मिळतं म्हणून चालत नसतात, तर नाद असतो म्हणून बैलगाडी शर्यतींना रंगत असते. आता बैलगाडी शर्यतींचा विषय निघालाय म्हंटल्यावर त्याचा नाद असलेली नावं आपोआप समोर येतात आणि त्यातलं एक नाव म्हणजे पंढरीनाथ फडके.
ADVERTISEMENT
फोरव्हिलरच्या सीटवर कमी आणि टपावर जास्त दिसणारे पंढरीनाथ फडके आता चर्चेचा विषय झाले आहेत. घटना आहे अंबरनाथची. अंबरनाथमध्ये पंढरीनाथ फडके आणि त्यांचे बैलगाडा शर्यतीतले कट्टर विरोधक राहुल पाटील आमनेसामने आले आणि तिथंच फडकेंकडून गोळीबार झाला. धडाधड गोळ्या झाडल्यामुळे आजूबाजूला तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि चर्चा झाली की नेमके पंढरीनाथ फडके कोण?
अंगावर किलोभर सोनं, गाडीच्या टपावर बसून वरात आणि बादल बैलाची क्रेझ हे सगळं चित्र आहे, पनवेलच्या विहीघरमध्ये राहणाऱ्या पंढरीनाथ फडकेंचं. बैलांना महिन्याभराला लाखभर रुपयांची खाद लागते. खादीमध्ये शेंगदाणे, काजू, बदाम, डाळ, पिस्ता, खोबरं, अशा सगळ्यांचा वापर करून बैलांना अंगाने तंदुरुस्त बनवण्यामध्ये पंढरीनाथ फडके नंबर वनला असतात.
1986 सालापासून वडिलांमुळे फडकेंना बैलगाडीचा नाद लागला. शर्यत जिंकल्यावर कोंबडा किंवा मेंढा मिळायचा, तरीही शर्यत जिंकायची क्रेझ वेगळीच होती. तिथूनपासून सुरु झालेली आवड फडकेंनी आजतागायत राखुन ठेवली आहे. आतापर्यंत 40 ते 45 शर्यतीची बैलं फडकेंनी राखलीत. शर्यत मारेपर्यंत बैलाला राखायचं. नंतर शर्यतीमध्ये मागे राहू लागला की त्या बैलाला विकायचं आणि त्याच्या जागी दुसरा बैल घ्यायचं, असं चक्र पंढरीनाथांच सुरु असतं.
कुठल्याही शर्यतीमध्ये एक नंबरला बैल पळायला लागला की त्याच्यावर पंढरी नाथांची नजर असतेच, मग त्याची कितीही किंमत होऊ द्या, त्याला आपल्याकडे घ्यायचंच, असा प्रण पंढरीनाथांचा असतो. बैल नजरेत बसला की कितीही पैसे लागू द्या, त्याला विकत घेणारा बैलमालक म्हणून पंढरीनाथांची ओळख आहे.
बादल कसा ठरला गेमचेंजर?
याच पंढरीनाथांकडे महाराष्ट्रातील टॉपचा समजला जाणारा बादल बैल आहे. याच बादलनं तब्बल 11 लाख रुपये बक्षीस असलेली शर्यत जिंकली, एकदा का बादल घरातून बाहेर पडला, की त्याचे चाहते थेट शर्यतीचं मैदान गाठतात. पंढरीनाथांचा बैल, त्यांचाच गाडा, त्यांचीचं पोरं आणि त्यांचीच खाद, ज्या चालकानं शर्यत मारुन दिलीये, त्या चालकाला मोठं बक्षिस पंढरीनाथांकडून असतंच, मग ते दोन चाकी असो अजून काही.
पंढरीनाथांचा बादल हा, माणसात मिसळणारा आहे. रोज व्यायाम, वेळच्या वेळी खाद आणि निगा राखल्यानं बादलनेही पंढरीनाथांना श्रीमंती दाखवली आहे, असं म्हणतात. त्यामुळे घाटाखालच्या असो की घाटावरच्या मोठ्या बक्षिसांच्या शर्यतीला बादल जाणार, हे ठरलेलं असतं.
ADVERTISEMENT











