शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांना थेट भिडणारे ‘महेश सावंत’ आहेत तरी कोण?

मुंबई तक

• 12:44 PM • 12 Sep 2022

महाराष्ट्रात जिथे शिंदे गटाचे आमदार, खासदार, पदाधिकारी आहेत, तिथे वाद, असं चित्र आता समोर येऊ लागलं आहे. आणि तो वाद दुसऱ्या-तिसऱ्या कोणासोबत नसून खुद्ध शिवसैनिकांमध्येच होतोय. सगळ्या महाराष्ट्रात हा वाद होत असताना मुंबईही मागे राहिली नाही. मुंबईत वाद झाला तो थेट आमदार सदा सरवणकर यांच्यासोबत. कधीकाळी त्यांचेच कट्टर समर्थक असणारे महेश सावंत त्यांनाच जाऊन भिडले. […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात जिथे शिंदे गटाचे आमदार, खासदार, पदाधिकारी आहेत, तिथे वाद, असं चित्र आता समोर येऊ लागलं आहे. आणि तो वाद दुसऱ्या-तिसऱ्या कोणासोबत नसून खुद्ध शिवसैनिकांमध्येच होतोय. सगळ्या महाराष्ट्रात हा वाद होत असताना मुंबईही मागे राहिली नाही. मुंबईत वाद झाला तो थेट आमदार सदा सरवणकर यांच्यासोबत. कधीकाळी त्यांचेच कट्टर समर्थक असणारे महेश सावंत त्यांनाच जाऊन भिडले. या वादादरम्यान गोळीबार देखील झाल्याचं बोललं जातंय.

हे वाचलं का?

याप्रकरणात महेश सावंत यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आणि अटक देखील झाली होती. त्यानंतर थेट मातोश्रीवर त्यांना बोलवण्यात आलं. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या बाजूच्या खुर्चीवर बसवून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देखील दिली. शिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रह्मास्त्र असल्याचे कौतुकाचे बोल उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवले. त्यामुळे नेमके महेश सावंत आहेत तरी कोण? अशी चर्चा सुरु झालीय.

नेमकं काय घडलं होतं?

गणपती विसर्जनादिवशी एका बाजूला सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर तर दुसऱ्या बाजूला प्रभादेवी दादरचे शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत. अशातच समाधान सरवणकरांनी म्यांव-म्यांव म्हणून शिवसैनिकांना डिवचायला सुरुवात केली. तिथूनच खरा राडा सुरु झाला. आणि राड्याचं रुपांतर हाणामारीत झाल्याचं समोर येतंय. महेश सावंतांनी शिंदे गटातील शाखा प्रमुख संतोष तेलवणेंना हाणामारी केल्याचा आरोप शिंदे गटाने केलाय. त्यामुळे संतोष तेलवणे आणि समाधान सरवणकरांनी ज्या पोलीस ठाण्यात महेश सावंतांना नेलं होतं, त्याच्या समोरच राडा झाला.

कोण आहेत महेश सावंत?

वडील शिवसेनेत असल्यामुळे 1990 पासून महेश सावंतांनीही शिवसेनेचं काम करायला सुरुवात केली.महेश सावंत हे एकेकाळी आमदार सदा सरवणकरांचे कट्टर समर्थक होते. शिवसेनेची आंदोलने, सामाजिक उपक्रमात सहभाग अशा गोष्टींमुळे सावंतांचा परिसरात चांगला जनसंपर्क तयार झाला. 2009 मध्ये सदा सरवणकरांनी शिवसेना सोडून नारायण राणेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा महेश सावंतांनीही शिवसेना सोडली होती.

काही वर्षांनी सदा सरवणकर शिवसेनेत परतले, तेव्हा महेश सावंतही शिवसेनेत दाखल झाले. पक्षाचं काम करुनही पालिका निवडणुकीत संधी न मिळाल्याने 2017 मध्ये सावंत आणि सरवणकर यांच्यात वाद सुरु झाला. त्यावेळी सावंतांनी सेनेत बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली, मात्र समाधान सरवणकरांकडून फक्त 250 मतांनी त्यांचा पराभव झाला. समाधान सरवणकरांना 8623 तर अपक्ष उमदेवार महेश सावंतांना 8364 मते मिळाली होती.

जेव्हा सदा सरवणकरांनी शिंदे गटाशी हात मिळवणी केली तेव्हा त्यांचे विरोधक सावंतांना विभागप्रमुखपदाची जबाबदारी देऊ केली. पालिका निवडणुकीत सरवणकरांविरोधात लढण्यासाठी सावंत हाच हुकमी एक्का समोर केल्याच्या चर्चा आता सुरु झाल्यात. मात्र पालिका निवडणुकीआधीच राडा, हाणामारींचं सत्र सुरु झाल्याने येणाऱ्या काळात हा वाद कुठपर्यंत पोहचणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

    follow whatsapp