एकनाथ शिंदे राज ठाकरेंना दसरा मेळाव्याला बोलवणार? मुख्यमंत्री म्हणाले..

मुंबई तक

• 09:56 AM • 06 Sep 2022

महाराष्ट्रात दोन वर्षांनी गणेश उत्सव (Ganesh Utsav) अत्यंत उत्साहात आणि निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होतो आहे. गणेश उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) राजकीय भेटीगाठी घेत आहेत. तसंच गणेश उत्सव साजरा होत असतानाच चर्चा सुरू झाली आहे ती दसरा मेळाव्याची. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचा दसरा मेळावा उद्धव ठाकरेंकडून (Uddhav Thackeray) हायजॅक करण्याच्या तयारीत आहेत अशी […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात दोन वर्षांनी गणेश उत्सव (Ganesh Utsav) अत्यंत उत्साहात आणि निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होतो आहे. गणेश उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) राजकीय भेटीगाठी घेत आहेत. तसंच गणेश उत्सव साजरा होत असतानाच चर्चा सुरू झाली आहे ती दसरा मेळाव्याची. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचा दसरा मेळावा उद्धव ठाकरेंकडून (Uddhav Thackeray) हायजॅक करण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा आहे. एवढंच नाही तर राज ठाकरेंनाही (Raj Thackeray) ते या मेळाव्याला बोलावतील अशीही शक्यता आहे.

हे वाचलं का?

दसरा मेळावा आपलाच होणार, उद्धव ठाकरेंची गर्जना

दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे आणि दसरा मेळावा आपलाच होणार हे उद्धव ठाकरे यांनी ठासून सांगितलं आहे. मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे हेच दसरा मेळावा घेतील अशा चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यातही त्यांना दसरा मेळाव्याविषयी प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी एकनाथ शिंदेंचाच दसरा मेळावा होईल आणि त्यांनी मला बोलावलं तर मी पण त्या मेळाव्याला जाईन असंही त्यांनी सांगितलं होतं.

दुसरीकडे राज ठाकरेंना दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आमंत्रण देतील अशी चर्चाही राजकारणात रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज ठाकरेंबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी महत्त्वाचं उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे गणपतीच्या दर्शनासाठी एबीपी माझाच्या कार्यालयात गेले होते. तिथेच त्यांना हा प्रश्न विचारला गेला.

एकनाथ शिंदे राज ठाकरेंना दसरा मेळाव्याला बोलवण्याबाबत नेमकं काय म्हणाले?

जेव्हा आमचं सरकार स्थापन होत होतं तेव्हाही गॉसिप्स होत होती. अजून गणपती विसर्जन झालेलं नाही. त्यानंतर पितृपक्ष आहे. त्यानंतर नवरात्र आहे. त्यानंतर दसरा आहे पाहू ना तेव्हा काय होतं. दसरा यायला बराच अवधी आहे. मधे बऱ्याच गोष्टी होत असतात, असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. त्यांनी राज ठाकरेंना बोलवणार का? याचं उत्तर हो असंही दिलेलं नाही आणि नाही असंही दिलेलं नाही. त्यामुळे याबाबत चर्चा सुरू असाव्यात ही शक्यता आहे.

महाराष्ट्र सैनिकांची राज ठाकरेंकडून काय अपेक्षा आहे?

प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा मी पुढे घेऊन जातो आहे. मला चिन्हाची गरज नाही, असंही राज ठाकरे त्यांच्या भाषणात म्हणाले होते. हाच धागा पकडत महाराष्ट्र सैनिकांनी ही भूमिका मांडली आहे की दसरा मेळावा राज ठाकरेंनी घ्यावा. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली दिली आहे त्यामुळे दसरा मेळावा राज ठाकरेंनीच घ्यावा अशी विनंती मनसैनिक करत आहेत. आता याबाबत राज ठाकरे काय निर्णय घेणार पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

२१ जूनला शिवसेनेत झालं सर्वात मोठं बंड

२१ जूनला शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारलं. त्यांना शिवसेनतल्या ४० आमदारांची साथ लाभली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारी शिवसेना आम्हीच आहोत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेना दुभंगली असून शिवसेनेत दोन गट पडले आहेत. पहिला गट आहे तो उद्धव ठाकरे गट आणि दुसरा आहे तो एकनाथ शिंदे गट. महाराष्ट्रात जे बंड झालं त्यानंतर अवघा महाराष्ट्र हादरला. शिंदे गटाकडून पक्षाचं चिन्हही आपलंच आहे आम्हीच खरी शिवसेना आहोत हे सांगितलं जातं आहे. अशात हा वाद सुप्रीम कोर्टातही पोहचला आहे.

यंदाचा दसरा मेळावा हा कोरोनाचं संकट नसल्याने शिवाजी पार्क मैदानात घेतला जाणार आहे. मात्र हा मेळावा उद्धव ठाकरेंचा होणार की एकनाथ शिंदेंचा याविषयीच्या चर्चांना उधाण आलं आहे. बाळासाहेब ठाकरेंपासूनच दसरा मेळाव्याची परंपरा सुरू झाली आहे. विचारांचं सोनं लुटायला चला अशा घोषवाक्यासह हा दसरा मेळावा दरवर्षी घेतला जातो. शिवसेनेच्या पक्ष प्रमुख पदी असलेली व्यक्ती हा मेळावा घेते. बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत तेच या मेळाव्याच्या अग्रस्थानी होते. त्यानंतर उद्धव ठाकरे हा मेळावा घेऊ लागले. आता यंदा हा मेळावा कोण घेणार हा प्रश्न मात्र चांगलाच चर्चेत आहे.

    follow whatsapp