पत्नीवर भर रस्त्यात चाकूचे वार, नंतर स्वतःवरही झाडली गोळी; डोंबिवलीतील धक्कादायक घटना

–मिथिलेश गुप्ता, डोंबिवली डोंबिवलीतील दत्तनगर वसाहतीत चारित्र्यावर संशय घेत पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. चाकू हल्ला करून पत्नीला जखमी करणाऱ्या पतीने नंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सूरू आहेत. डोंबिवलीतील दत्तनगर वसाहतीमध्ये राहणाऱ्या सोमनाथ देवकर याने राहत्या घरात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 12:54 PM • 13 Feb 2022

follow google news

मिथिलेश गुप्ता, डोंबिवली

हे वाचलं का?

डोंबिवलीतील दत्तनगर वसाहतीत चारित्र्यावर संशय घेत पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. चाकू हल्ला करून पत्नीला जखमी करणाऱ्या पतीने नंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सूरू आहेत.

डोंबिवलीतील दत्तनगर वसाहतीमध्ये राहणाऱ्या सोमनाथ देवकर याने राहत्या घरात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आज (13 फेब्रुवारी) सकाळी ही घटना घडली. या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

डोंबिवली पुर्वेकडील दत्तनगर येथील गावदेवी मंदिराजवळ सोमनाथ व पत्नी वंदना राहतात. चारित्र्यावर संशय आणि चोरीच्या संशयातून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होते. याच कारणावरून 8 फेब्रुवारी रोजी सोमनाथने पत्नीला मारहाण केली. त्यानंतर महिला तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात निघाली. मात्र, सोमनाथने पत्नीवर भररस्त्यात चाकूने वार केले.

चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या पत्‍नी वंदना हिला उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. या घटनेनंतर डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात सोमनाथ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर सोमनाथ घटनेनंतर फरार झाला होता. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता.

दरम्यान, रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सोमनाथ राहत्या घरी आला. घराबाहेर लावलेलं कुलूप तोडून तो घरात शिरला व जवळ असलेल्या बंदुकीने छातीत गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात सोमनाथ गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटना स्थळी धाव घेतली.

सोमनाथला उपचारासाठी डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार त्याने हे रिव्हॉल्व्हर मध्य प्रदेश येथून आणले असून, त्या पिस्तूलाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. रिव्हॉल्व्हर बेकायदेशीर असून, त्याने ती रिव्हॉल्व्हर कुणाकडून विकत घेतली, याचा तपास केला जात आहे, अशी माहिती डोंबिवली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली.

    follow whatsapp