CJP Protest: एका बाजूला पोलीस, दुसरीकडे आजींच्या निधनाची बातमी; अभिजीत दिपकेंवर संकट

मुंबई तक

• 03:11 PM • 10 Oct 2026

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना दिल्लीमध्ये आंदोलनासाठी गेले असताना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, हिंगोलीतील संतुक पिंपरी येथे त्यांच्या आजी सावित्रीबाई शंकर दिपके यांचं दीर्घ आजाराने निधन झालं असून, त्यांच्या आईने पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे.

abhijeet dipke delhi police custody grandmother savitribai dies hingoli

अभिजीत दिपके

Google CTA

हिंगोली: कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके  (Abhijeet Dipke) यांना दिल्लीत आंदोलनासाठी जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. अभिजीत सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असतानाच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिजीत दिपकेंच्या आजी सावित्रीबाई शंकर दिपके यांचं आज (शनिवारी, 10 ऑक्टोबर) दीर्घ आजाराने निधन झालं. त्या सुमारे 80 वर्षांच्या होत्या. हिंगोली जिल्ह्यातील संतुक-पिंपरी या त्यांच्या मूळ गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हे वाचलं का?

एका बाजूला अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये नाराजी आहे, तर दुसऱ्या बाजूला कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे. या दुहेरी संकटामुळे दिपके कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हिंगोलीतील मूळ गावी सावित्रीबाईंनी घेतला अखेरचा श्वास

अभिजीत दिपके हे मूळचे छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आहेत. हिंगोली जिल्ह्यातील संतुक-पिंपरी हे त्यांचं पैतृक गाव आहे. त्यांचे आजी-आजोबा याच गावात राहत होते. सावित्रीबाई शंकर दिपके यांची प्रकृती गेल्या काही काळापासून ठीक नव्हत्या. दीर्घ आजाराशी झुंज देत असताना शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

हे ही वाचा>> 'बाळा, हे सरकार विचित्र आहे...' दिपकेंच्या आईला अश्रू अनावर, तर वडिलांचा संताप, काय म्हणाले?

सावित्रीबाईंच्या निधनाची बातमी समजल्यानंतर दिपके कुटुंबीय आणि संतुक-पिंपरी गावात शोकाचं वातावरण निर्माण झालं आहे. अभिजीत यांचे आई-वडील छत्रपती संभाजीनगरमधील 'शंकर सदन' या निवासस्थानातून संतुक-पिंपरीकडे रवाना होण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे.

आंदोलनासाठी दिल्लीत गेलेल्या अभिजीत दिपकेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात

अभिजीत दिपके हे कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक आहेत. ते आंदोलनासाठी दिल्लीला गेले होते. मात्र, शनिवारी त्यांना विमानातूनच पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. त्यांच्या ताब्यात घेण्याच्या कारवाईमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

हे ही वाचा>> दीपके, रांका आणि दास यांना अटक, आंदोलनाची पुढील धुरा सांभाळणार मराठी मुलगा

अभिजीत यांना ताब्यात घेतल्याच्या कारवाईवर त्यांच्या आईने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. देशासाठी काम करणाऱ्या तरुणांवर अशा प्रकारची कारवाई का केली जाते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, गुन्हे करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत देशासाठी काम करणाऱ्या मुलांना ताब्यात घेतलं जात असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.

'मुलाला अटक होऊ शकते', आईला आधीपासूनच होती भीती

अभिजीत दिपके यांच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, मुलाला अटक होण्याची शक्यता त्यांना आधीपासूनच वाटत होती. अभिजीत घरातून दिल्लीला जाण्यासाठी निघाले, त्यावेळीही त्यांनी मुलाला याबाबत सावध केलं होतं. दिल्लीत गेल्यानंतर त्याच्यावर पोलिसांकडून कारवाई होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती.

मात्र, अभिजीत यांनी आईला काळजी करू नका, असं सांगत अशी कोणतीही कारवाई होणार नसल्याचा विश्वास दिला होता. प्रत्यक्षात त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आईने नाराजी व्यक्त केली आहे.

आजीच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

अभिजीत दिपके सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असल्याने त्यांच्या आजीच्या अंत्यविधीसाठी ते उपस्थित राहू शकणार का, याबाबत प्रश्न निर्माण होतो. मात्र, त्यांच्या उपस्थितीबाबत किंवा पोलिसांकडून कोणती परवानगी दिली जाणार आहे, याबाबतची माहिती उपलब्ध नाही.

सावित्रीबाई शंकर दिपके यांच्या निधनामुळे दिपके कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकीकडे अभिजीत यांना ताब्यात घेतल्याने कुटुंबीयांमध्ये नाराजी आहे, तर दुसरीकडे आजीच्या निधनामुळे कुटुंब शोकाकुल झालं आहे.