काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षांची धारदार शस्त्रांनी वार करुन हत्या, राष्ट्रवादीच्या नेत्यासह काँग्रेस नेते आरोपी

Akola Crime News : प्राथमिक माहितीनुसार, राजकीय आणि कौटुंबिक वादातून उबेद पटेल या तरुणाने हिदायत पटेल यांच्यावर चाकूने हल्ला केल्याचं समोर आलं होतं. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला होता. मात्र रात्री अकोट तालुक्यातील पणज गावातील नागरिकांनी संशयित आरोपी उबेद पटेलला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. या घटनेनंतर अकोला जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Akola Crime News

Akola Crime News

मुंबई तक

07 Jan 2026 (अपडेटेड: 07 Jan 2026, 09:40 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षांची धारदार शस्त्रांनी वार करुन हत्या

point

राष्ट्रवादीच्या नेत्यासह काँग्रेस नेते आरोपी

Akola Crime News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर आज (दि.7) पहाटे त्यांचा मृत्यू झाला आहे. हिदायत पटेल यांच्यावर मंगळवारी (6 जानेवारी) अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या मोहाळा गावात धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले होते. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हे वाचलं का?

प्राथमिक माहितीनुसार, राजकीय आणि कौटुंबिक वादातून उबेद पटेल या तरुणाने हिदायत पटेल यांच्यावर चाकूने हल्ला केल्याचं समोर आलं होतं. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला होता. मात्र रात्री अकोट तालुक्यातील पणज गावातील नागरिकांनी संशयित आरोपी उबेद पटेलला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. या घटनेनंतर अकोला जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या हल्ला प्रकरणात काही बड्या राजकीय नेत्यांची नावे तक्रारीतून समोर आल्याने प्रकरण अधिक गंभीर बनलं आहे. अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, यामध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रूजम्मा, अकोटचे माजी काँग्रेस नगराध्यक्ष संजय बोडखे, काँग्रेसचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती राजीव बोचे यांच्यासह हल्लेखोर उबेद पटेल आणि आणखी एका व्यक्तीचा समावेश आहे. हिदायत पटेल जिवंत असताना या प्रकरणात खुनाचा प्रयत्न आणि कट रचल्याचे आरोप ठेवत गुन्हे दाखल करण्यात आले होते. पटेल कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे अकोट ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली होती. मात्र आता हिदायत पटेल यांचा मृत्यू झाल्यानंतर या गुन्ह्यात खुनाची कलमे वाढवली जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तक्रारीत मोठ्या राजकीय नेत्यांची नावे आल्याने तपास यंत्रणांवरही दबाव वाढल्याचं चित्र आहे.

हेही वाचा : रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, 'विलासरावांच्या...'

मशिदीतून बाहेर पडताच हल्ला

घटनेच्या दिवशी मंगळवारी दुपारी सुमारे दोनच्या सुमारास हिदायत पटेल हे मोहाळा गावातील मशिदीत नमाज अदा करून बाहेर पडत होते. त्याचवेळी उबेद पटेलने अचानक त्यांच्यावर चाकूने हल्ला चढवला. हल्ल्यात त्यांच्या पोटावर आणि मानेवर वार करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने अकोटमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगितलं होतं. मात्र सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात थेट जिल्हास्तरीय नेत्यांची नावे समोर आल्याने अकोला जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हल्ला आणि कट रचल्याच्या आरोपाखाली पाच जणांवर गुन्हे दाखल झाले असून, आता खुनाचा गुन्हा किती जणांवर दाखल होतो, याबाबत उत्सुकता आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हिदायत पटेल कोण होते?

हिदायत पटेल यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्षपदाची जबाबदारी होती. अकोला जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा प्रमुख मुस्लिम चेहरा म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. 2014 मध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर, तर 2019 मध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. जिल्ह्यातील नामवंत सहकार नेते म्हणून त्यांचा मोठा प्रभाव होता. सुमारे 25 वर्षे ते जिल्हा बँकेचे संचालक होते. सध्या ते अकोट तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष होते. गेली 35 वर्षे अकोट बाजार समितीशी त्यांचा घनिष्ठ संबंध असून, ते माजी सभापती आणि सध्या संचालक म्हणून कार्यरत होते. हिदायत पटेल यांच्या मृत्यूने अकोला जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

विद्यार्थीनीला वसतीगृहात जबरदस्ती नमाज पढायला लावला, पालघरमधील धक्कादायक प्रकार; गुन्हा दाखल

    follow whatsapp