Amit Thackeray stopped mid speech at mns event : अमित ठाकरे मनसेच्या कार्यक्रमात स्टेजवर भाषण करत असताना काही क्षणांसाठी अचानक थांबले आणि त्यांना पुढे काय बोलायचे हे सुचेनासे झाले. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) 20 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य मेळाव्यात हा प्रसंग घडला. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. याच कार्यक्रमात मनसेच्या वतीने राज्यव्यापी सदस्य नोंदणी अभियानाचाही अधिकृत शुभारंभ करण्यात आला. अलीकडील विद्यार्थी आंदोलनं आणि पेपर लीकच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि अमित ठाकरे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काय भूमिका मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
ADVERTISEMENT
हेही वाचा : नवरा कामासाठी परराज्यात, इकडे बायकोने 6 महिन्यांच्या मुलाला संपवलं, नेमकं कारण काय?
राज ठाकरेंचा मुलगा नसतो तर मी राजकारणात आलो नसतो - अमित ठाकरे
भाषणाच्या सुरुवातीलाच अमित ठाकरे यांनी विविध विद्यार्थी आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या युवक-युवतींचे आणि त्यांच्या पालकांचे कौतुक केले. आंदोलनातून केंद्रात राजीनामा घडवून आणणाऱ्या तरुणांसाठी जोरदार टाळ्या वाजवण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. त्यानंतर त्यांनी स्वतःबद्दल बोलताना, "मी राजसाहेबांचा मुलगा नसतो तर मी राजकारणात आलो नसतो," असे स्पष्टपणे सांगितले. मात्र, त्याचवेळी केवळ राज ठाकरे यांच्यामुळे नव्हे, तर कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळेच आपण राजकारणात टिकून आहोत, असेही त्यांनी नमूद केले. राज्यभराच्या दौऱ्यात अनेक तरुणांना भेटण्याची संधी मिळाली आणि मनविसेची उभारणी कार्यकर्त्यांच्या जोरावरच झाली, असेही ते म्हणाले.
'मला खरंच सुचत नाही... मी पाठ करून आलो नाही'
यानंतर त्यांनी गेल्या काही वर्षांतील विविध आंदोलनांचा उल्लेख करत, आपण केलेल्या संघर्षात विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत कधीही मागे हटलो नाही, असे सांगितले. मात्र आता त्या आंदोलनांकडे मागे वळून पाहण्यापेक्षा पुढे पाहण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याचदरम्यान अचानक ते काही क्षण थांबले. "तुमच्या उत्साहामुळे मला आता विसरायला लागलंय... मला खरंच सुचत नाही... मी पाठ करून आलो नाही," असे त्यांनी व्यासपीठावरच हसत कबूल केले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून धडकी भरल्याचेही त्यांनी सांगितले. काही क्षणांनी त्यांनी पुन्हा भाषण सुरू करत, कार्यकर्त्यांची ताकदच आपला आत्मविश्वास असल्याचे नमूद केले.
भाषणाच्या पुढील भागात अमित ठाकरे यांनी अलीकडील विद्यार्थी आंदोलनांचा संदर्भ देत, कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळेच कठीण प्रसंगांमध्ये उभे राहण्याचे बळ मिळते, असे सांगितले. आपल्या मागे कार्यकर्त्यांची ताकद आणि राज ठाकरे यांचे नेतृत्व असल्यामुळेच आत्मविश्वास वाढतो, असे ते म्हणाले. तसेच महाराष्ट्र पोलिसांबद्दल बोलताना, ते घाबरलेले नव्हते, तर आदराची भावना असल्यामुळे शांत होते, असे त्यांनी म्हटले. राज्यात पोलीस बांधवांसाठी जर कोणी उभे राहिले असेल तर ते राज ठाकरे आणि महाराष्ट्र सैनिक असल्याचेही त्यांनी भाषणात नमूद केले. शेवटी राज्य आणि देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करत त्यांनी हिंसाचाराच्या घटनांचा उल्लेख केला आणि विद्यार्थी आंदोलनांमुळे केंद्रात राजीनामा झाला असून, राज्यातही बदल घडवून आणण्याची ताकद तरुणांमध्ये असल्याचा दावा केला.
ADVERTISEMENT












