मुंबईः मुंबई महानगरपालिका निवडणुकीआधी भाजपने केलेल्या गोपनीय सर्व्हेने सत्ताधारी महायुतीतच मोठी खळबळ माजवली आहे. या सर्व्हेनुसार, मुंबईतील मुस्लिम बहुल भागात भाजप आणि भाजपच्या चिन्हाला थेट विरोध आहे, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाला आणि नेतृत्वाला मुस्लिम मतदारांकडून स्पष्ट पसंती मिळत आहे.
ADVERTISEMENT
सर्व्हेतील महत्त्वाचे निरीक्षण
- मुंबईत एकूण १८ वॉर्ड असे आहेत जिथे ७० टक्क्यांहून अधिक मुस्लिम मतदार आहेत. या सर्व १८ वॉर्डात भाजप उमेदवाराला मुस्लिम समाजातून प्रबळ विरोध असल्याचे दिसते.
- मात्र याच १८ वॉर्डात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुस्लिम मतदार, विशेषतः महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळेल असा अंदाज आहे.
- शिंदे यांच्या ‘लाडक्या बहिणी योजने’मुळे मुस्लिम महिलांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढल्याचे सर्व्हेत नमूद आहे.
- मुंबईत १८ प्रभाग असे आहेत जिथे ५० टक्के किंवा त्याहून अधिक मुस्लिम मतदार आहेत.
- ७ प्रभागांमध्ये ३५ टक्के मुस्लिम मतदार आहेत, पण विजयासाठी हे मतदान निर्णायक ठरते.
- या एकूण ४३ प्रभागांपैकी बहुतांश ठिकाणी शिंदे यांच्या शिवसेनेला पसंती असल्याने भाजपला या जागा शिंदे गटाला सोडण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी चर्चा युतीच्या वरिष्ठ स्तरावर सुरू आहे.
भाजपकडून रस्सीखेच नाही?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “मुस्लिम बहुल भागात भाजपला मत मिळणार नाही हे स्पष्ट झाल्याने त्या जागा शिंदे गटाला देण्यात भाजपकडून फारशी आडकाठी होणार नाही. उलट युतीच्या एकूण जागा आणि मतांच्या हिशोबात याचा फायदा होईल.” यामुळे आगामी जागावाटपात शिंदे गटाला मुस्लिमबहुल प्रभागात मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेना (UBT) साठी धोक्याची घंटा
२०१९ पासून उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत प्रवेश केल्यापासून मुंबईतील मुस्लिम समाजाचा मोठा पाठिंबा त्यांना मिळाला होता. मात्र आता शिंदे यांच्या वाढत्या प्रभावामुळे हे मतदान विभागले जाण्याची भीती आहे.
राजकीय विश्लेषक म्हणतात, “जर मुस्लिम महिलाही शिंदे यांच्या बाजूने झुकल्या तर उद्धव ठाकरेंना मुंबईत मोठा फटका बसेल. कारण यापूर्वी मुस्लिम मतदार हा उद्धव ठाकरेंचा कोअर वोट बँक मानला जात होता.”
येत्या आठवड्यात महायुतीच्या जागावाटप बैठकीत हा सर्व्हे महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मुस्लिम बहुल ४० ते ४५ प्रभाग शिंदे गटाला मिळाले तर मुंबई महापालिकेत युतीची ताकद लक्षणीय वाढू शकते, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि एमव्हीएला आपली रणनीती पूर्णपणे बदलावी लागेल.
सर्व्हेतील निष्कर्ष खरे ठरले तर मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते.
ADVERTISEMENT











