Chandrashekhar Bawankule : नागपूर : भाजपमध्ये बाहेरुन आलेल्या उमेदवारी दिल्यामुळे नाराजीचे सूर अधिक तीव्र होताना दिसत आहेत. प्रभाग 15 मधील उमेदवारीबाबत बाहेरून आलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जात असल्याच्या आरोपावरून आज भाजप कार्यकर्त्यांचा संयमाचा बांध फुटला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी थेट भाजप प्रदेश नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना घेरत जाब विचारला.
ADVERTISEMENT
प्रभाग 15 मधील दोन महिलांच्या जागांवर नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दोन महिला उमेदवारांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर नाराज कार्यकर्ते एकत्र आले. “प्रभागाच्या बाहेरील लोकांनाच उमेदवारी दिली जाणार असेल, तर वर्षानुवर्षे पक्षासाठी राबणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काय करायचं?” असा थेट सवाल यावेळी करण्यात आला. गडकरींच्या घरातून बाहेर पडत असताना बावनकुळे यांना कार्यकर्त्यांनी घेरले आणि आपली नाराजी उघडपणे मांडली.
कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, मागील 30 ते 40 वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणाऱ्यांना डावलले जात आहे. त्याऐवजी काँग्रेसमधून आलेल्या पदाधिकाऱ्यांना आणि नव्याने प्रवेश केलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिली जात असल्याने तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. “पक्षासाठी आयुष्य खर्ची घातल्यानंतरही डावलले जाणे ही आमच्यासाठी मोठी वेदना आहे,” अशी भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
या घडामोडींनंतर परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. “तुमच्या भावना आणि तक्रारी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू. योग्य तो विचार केला जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, कार्यकर्त्यांनी केवळ आश्वासन नको, तर ठोस निर्णय हवा असल्याची मागणी यावेळी ठामपणे मांडली.
उमेदवारी नाकारल्याने भाजप कार्यकर्त्यांची नाराजी उघडपणे समोर आल्याने पक्षातील अंतर्गत अस्वस्थता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीमुळे प्रभाग पातळीवरील असंतोष किती खोलवर आहे, हे स्पष्ट झाले आहे. आता वरिष्ठ नेतृत्व या नाराजीची दखल घेऊन काय निर्णय घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











