BJP first Candidate list for Mumbai Mahapalika election 2026 : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपल्या काही प्रमुख उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांना मुंबईतील वॉर्ड क्रमांक 47 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांना वॉर्ड क्रमांक 9, तर माजी नगरसेवक जितेंद्र पटेल यांना वॉर्ड क्रमांक 10 मधून पक्षाकडून मैदानात उतरवण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन हे देखील मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सक्रिय होणार असून, मानखुर्द–शिवाजीनगर येथील प्रभाग क्रमांक 135 मधून ते निवडणूक लढवणार आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांनाही वॉर्ड क्रमांक 107 मधून उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.
या सर्व उमेदवारांनी आजच आपले उमेदवारी अर्ज दाखल करावेत, अशा सूचना भाजपकडून देण्यात आल्याची माहिती आहे. अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच संबंधित उमेदवारांना अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजपकडून ही यादी थोड्याच वेळात औपचारिकरीत्या जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप तब्बल 128 जागांवर निवडणूक लढवणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ आज आणि उद्या असे दोन दिवस शिल्लक असतानाही, अंतिम यादी शेवटच्या टप्प्यापर्यंत जाहीर न केल्याची भूमिका पक्षाने घेतली आहे. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी ही खबरदारी घेतल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, दादर येथील वसंतस्मृती कार्यालयातून रविवारी रात्रीपासून भाजप उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरू करण्यात आले आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराज होणाऱ्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याची जबाबदारी संबंधित आमदारांवर सोपवण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजपच्या मुंबईतील उमेदवारांची यादी
नील सोमय्या – वॉर्ड क्रमांक 107
तेजिंदर सिंग तिवाना – वॉर्ड क्रमांक 47
नवनाथ बन – वॉर्ड क्रमांक 135
शिवानंद शेट्टी – वॉर्ड क्रमांक 9
संतोष ढाले – वॉर्ड क्रमांक 215
स्नेहल तेंडुलकर – वॉर्ड क्रमांक 218
अजय पाटील – वॉर्ड क्रमांक 214
सन्नी सानप – वॉर्ड क्रमांक 219
तेजस्वी घोसाळकर – वॉर्ड क्रमांक 2
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर देण्यात आघाडीवर असलेले भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांना मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ते मानखुर्द–शिवाजीनगरमधील वॉर्ड क्रमांक 135 मधून निवडणूक लढवत असून, मागील निवडणुकीत या प्रभागात शिवसेनेने विजय मिळवला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











