कोल्हापूर : महायुतीतील काही जागांवर अजूनही सहमती न झाल्याने राजकीय चित्र धूसर असतानाच काँग्रेसने रविवारी (दि.29) उशिरा 14 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करून हालचालींना वेग दिला. या यादीतील सर्व उमेदवार सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दिवसभर महायुतीत बैठका सुरू असल्या तरी अंतिम निर्णय न झाल्याने आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या प्रक्रियेत थेट हस्तक्षेप करावा लागणार असल्याची चर्चा आहे. महायुतीची उमेदवार यादी सोमवारी जाहीर होण्याची शक्यता असून, त्यात जनसुराज्य पक्षाला फारशी संधी मिळणार नाही, असे रविवारी दिसून आले.
ADVERTISEMENT
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी राज्य निवड मंडळाच्या मान्यतेने व खासदार शाहू महाराज छत्रपती, विधानपरिषदचे गटनेते जिल्हाध्यक्ष आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या सूचनेनुसार तसेच आमदार जयंत आसगांवकर, माजी आमदार श्री. मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार श्री. ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2025 साठी इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या खालील 14 उमेदवारांची दुसरी यादी रविवारी (दि.29 मंजूर करण्यात आली.
काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत प्रामुख्याने माजी नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांना संधी देण्यात आली आहे. माजी नगरसेवक डॉ. संदीप नेजदार यांना यावेळी डावलण्यात आले आहे. माजी महापौर स्वाती यवलुजे, माजी नगरसेवक सुभाष बुचडे, पद्मावती काकासाहेब पाटील, माजी नगरसेवक अजित पोवार यांच्या पत्नी रुपाली पोवार, माजी नगरसेवक हरिश चौगले यांचे पुत्र सचिन चौगले, शिवाजी कवाळे यांचे पुत्र रोहित कवाळे, अॅड. नीलेश नरुटे यांच्या पत्नी अॅड. पुष्पा नरुटे, सिद्धिविनायक एज्युकेशन सोसायटीचे विनायक कारंडे आणि सरोज सरनाईक यांना काँग्रेसने तिकीट दिले आहे. महायुतीची यादी जाहीर होण्याआधीच काँग्रेसने दोन टप्प्यांत उमेदवार घोषित करत आघाडी घेतली असून आतापर्यंत 61 उमेदवार जाहीर केले आहेत. याशिवाय मनसेच्या एका उमेदवारालाही काँग्रेसने पुरस्कृत केलं आहे.
दरम्यान, ‘मातोश्री’वरून आलेल्या सूचनांनुसार उद्धवसेनेने काँग्रेससोबत सात जागा लढवण्याचा निर्णय मान्य केला आहे. शहरप्रमुख सुनील मोदी यांनी पक्षादेश मान्य करत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र उद्धवसेनेतील प्रमुख पदाधिकारी शशिकांत बिडकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी अजित पवार गटात जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे. याचवेळी भारतीय कम्युनिस्ट पक्ष आपली भूमिका सोमवारी स्पष्ट करणार आहे.
आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारामुळे महाविकास आघाडीतील उमेदवार निश्चित करण्यात काँग्रेसने आघाडी घेतली आहे. मात्र मतभेदांमुळे राष्ट्रवादी (शरद पवार), वंचित बहुजन आघाडी आणि आप यांची स्वतंत्र युती आकारास आली आहे. सर्व आघाडी व युतींच्या उमेदवारांच्या घोषणा झाल्यानंतर अनेक इच्छुक अपक्ष म्हणून अर्ज दाखल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपची पहिली उमेदवार यादी, नवनाथ बन ते नील सोमय्या कोणा-कोणाला संधी?
ADVERTISEMENT











