कल्याण: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या (KDMC Election) पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या मुलाखती सुरू असताना आपापसातील वादाला हिंसक वळण लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले ठाकरेंचे दोन शिवसैनिक जखमी झाले आहेत. पण याचा या सगळ्या घटनेत अवघ्या तासाभरात एक वेगळाच ट्विस्ट आला. पण ते जाणून घेण्याआधी आपण सगळा मॅटर सविस्तर समजून घेऊया.
ADVERTISEMENT
आधी 'हे' घडलं...
मुलाखतीला आले अन् एकमेकांचं डोकी फोडली
त्यांच झालं असं की, कल्याणमधील शहाड शाखा प्रमुख निशिकांत ढोणे आणि विभाग प्रमुख भागवत बैसाने हे दोघेही शिवसेना UBT पक्षाचे पदाधिकारी निवडणुकीसाठी इच्छुक असल्याने आज (22 डिसेंबर) कल्याणमध्ये मुलाखतीसाठी आले होते. दोघांनी एकमेकांना मुलाखत केंद्रावर पाहिलं अन् तिथेच सगळा राडा झाला. एकाच पक्षातील या दोन्ही पदाधिकाऱ्यांमध्ये मुलाखत केंद्राबाहेरच बाचाबाची झाली. त्यानंतर काही वेळात दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वादावादी झाली. अचानक या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या झटापटीत निशिकांत ढोणे यांना मारहाण झाली, तर ढोणे यांनीही भागवत बैसाने यांना मारहाण केल्याचे समोर आले आहे. या घटनेत दोघेही जखमी झाले.
हाणामारीनंतर दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी थेट महात्मा फुले पोलीस ठाणे येथे धाव घेतली. पण यानंतर तासाभरातच असं काही घडलं की, मारहाण करणाऱ्या निशिकांत ढोणे आणि भागवत बैसाने यांनी चक्क एकमेकांची गळाभेट घेतली.
नंतर 'हे' घडलं
दरम्यान, हा प्रकार समजताच शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांनी तात्काळ महात्मा फुले पोलीस ठाणे गाठलं तर पक्षाचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने जमा झाले. घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अत्यंत आक्रमकपणे झालेल्या या मारहाणीनंतर निशिकांत ढोणे आणि भागवत बैसाने यांनी एकमेकांविरोधात पोलिसात तक्रार देखील केली होती.
याचवेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय (बंड्या) साळवी यांनी तात्काळ या सगळ्या प्रकरणात लक्ष घातलं. थोड्याच वेळाने मारहाण करणारे दोन्ही शिवसेना पदाधिकारी हे पोलीस स्टेशनच्या बाहेर आले. यावेळी विजय साळवी यांनी या दोघांमध्ये तात्काळ समेट घडवून आणला. यावेळी मनसेचे नेते हे देखील तिथे हजर होते.
दरम्यान, यानंतर माध्यमांशी बोलताना निशिकांत ढोणे म्हणाले की, 'मी शहाडमधील शिवसेना UBT पक्षाचा शाखा प्रमुख आहे. आज आमच्या मुलाखती होत्या. त्या मुलाखतीच्या इथे बाहेर आम्ही.. भागवत बैसाने आणि जेव्हा एकमेकांच्या समोर आलो तेव्हा आमच्या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. आमचं वैयक्तिक भांडण झालेलं आहे त्या वैयक्तिक भांडणातून ही झटापट झाली. सध्या आम्ही एकमेकांमधील हा विषय बंद केलेला आहे आणि प्रकरण मिटवलेलं आहे.'
'आम्ही कधीकधी मस्करीमध्ये एकमेकांना बोलायचो. पण आज मस्करीचं रागात रुपांतर झालं आणि दोघांमध्ये द्वेष निर्माण झाल्यानंतर वाद झाला. आमचा हा वैयक्तिक वाद होता. रागाच्या भरात एकमेकांना चुकून लागलं.'
याबाबत शिवसेना UBT पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय साळवी यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, 'शिवसेना UBT पक्षाच्या मुलाखती सुरू आहेत. एकंदरित 10 पॅनलमध्ये 100 जण इच्छुक आहेत. ज्यांच्या मुलाखती आज चालणार आहेत. त्यामुळे सगळे कार्यकर्ते जमतात, एकत्र येतात. त्यांच्यात काही मस्करीवरून भांडणं होतात. मी इथे नव्हतो.. आलो तेव्हा यांचे वाद सुरू होते. मी मिटवायला गेलो तोवर भांडण विकोपालं गेलं होतं. आता आम्ही दोघांपण समजवलं.'
'आता त्यांनी एकत्र बसवून पोलीस अधिकाऱ्यांसमोर दिलगिरी व्यक्त केली आणि दोघांनी पण आपल्या तक्रारी मागे घेतल्या आहेत. त्यामुळे प्रकरण मिटलेलं आहे. तसं यामध्ये शिवसेनेचा संबंध काही नाही.'
ADVERTISEMENT











