हिंगोली: हिंगोली नगरपरिषद निवडणुकीच्या प्रक्रियेत शिवसेना (शिंदे गट) चे आमदार संतोष बांगर यांच्यावर आक्षेपार्ह वर्तनाचा गंभीर आरोप झाला आहे. मतदान केंद्रातच घोषणाबाजी करणे, मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करणे आणि मतदानाच्या गोपनीयतेचा भंग करणे यामुळे बांगर यांच्यावर विरोधी पक्षांसह स्थानिक राजकीय वर्तुळातून तीव्र टीका होत आहे. या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
मतदान केंद्रातील आक्षेपार्ह प्रकार: व्हायरल व्हिडिओने खळबळ
हिंगोली नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी (आज) झालेल्या मतदानाच्या वेळी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर हे स्वतः मतदान केंद्रावर पोहोचले. मात्र, तेथे त्यांचे वर्तन संशयास्पद ठरले. उपलब्ध व्हिडिओ फुटेजनुसार, बांगर यांनी मतदान बूथबाहेरच "बालासाहेब ठाकरे की जय हो", "एकनाथ भाई शिंदे, आगे बढ़ो" अशी घोषणाबाजी केली. याशिवाय, एका महिलेला मतदान मशीनवर "वो बटन दबाओ" म्हणत सूचना देताना दिसत आहेत, ज्यामुळे मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाल्याचा आरोप होत आहे.
हे ही वाचा>> संतोष बांगरांनी सर्व नियम मोडले, मतदान केंद्रावर फोनवर गप्पा, बटण दाबण्यास सांगितलं अन् घोषणाबाजी VIDEO
मोबाइल फोनचा वापर, घोषणाबाजी करणे आणि मतदारांना थेट प्रभावित करण्याचा प्रयत्न हे सर्व मतदान नियमांचे उल्लंघन असल्याचे विरोधी पक्षातील नेते सांगत आहेत. हिंगोलीतील स्थानिक शिवसेना (UBT) आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी तात्काळ निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असून, बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
बांगर यांनी मात्र या आरोपांना फेटाळले असून, "मी फक्त माझे मतदान केले आणि कार्यकर्त्यांसोबत बोलत होतो. कोणतीही अनियमितता झालेली नाही," असे म्हटले आहे. तरीही, हे प्रकरण निवडणूक आयोगाच्या रडारवर आले असून, चौकशीची शक्यता आहे.
महायुतीतील अंतर्गत कलह: पूर्वीचे आरोप आणि पोलीस धाड
हा प्रकार हिंगोलीतील महायुतीतील (भाजप-शिवसेना शिंदे गट) अंतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घडला आहे. गेल्या आठवड्यातच (26 नोव्हेंबर) बांगर यांच्या निवासस्थानी सुमारे 100 पोलिसांनी पहाटे धाड टाकली होती, ज्यामुळे खळबळ उडालेली. बांगर आणि शिंदे गटाने हा प्रकार भाजपचा "राजकीय षडयंत्र" असल्याचा आरोप केला होता. भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी मात्र पलटवार करत बांगर यांच्यावर "50 कोटी रुपये घेऊन शिंदे गटात सामील झाल्याचा" गंभीर आरोप केलेला. या आरोप-प्रत्यारोपांमुळे हिंगोली नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचे दोन्ही घटक स्वतंत्रपणे लढत आहेत.
हे ही वाचा>> सलग दोन दिवस फडणवीस झाले नाराज, 'ते दोन' निर्णय अन् मुख्यमंत्री निराश!
फडणवीसांची प्रतिक्रिया: लोकशाहीची चाड ठेवा
या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, "मला असं वाटतं की, किमान लोक प्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे. लोक प्रतिनिधींनी निवडणुकांमध्ये आपण कसं वागतो आहोत, आपण काय संकेत देत आहोत, काय संदेश देत आहोत याचा विचार केला पाहिजे. असं माझं मत आहे." असं म्हणत फडणवीसांनी बांगर यांना सुनावलं आहे.
ADVERTISEMENT











