संतोष बांगरांनी सर्व नियम मोडले, मतदान केंद्रावर फोनवर गप्पा, बटण दाबण्यास सांगितलं अन् घोषणाबाजी VIDEO
Santosh Bangar : संतोष बांगरांनी सर्व नियम मोडले, मतदान केंद्रावर फोनवर गप्पा, बटण दाबण्यास सांगितलं अन् घोषणाबाजी VIDEO
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
संतोष बांगरांनी सर्व नियम मोडले, मतदान केंद्रावर फोनवर गप्पा
बटण दाबण्यास सांगितलं अन् घोषणाबाजी VIDEO
हिंगोली : नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना मतदान केंद्रावर मतदानासाठी गेलेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा एका वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मतदानाच्या दिवशीच त्यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला असून यात ते मतदान केंद्रात जाऊन एका महिला मतदाराला मतदान करताना ‘बटण दाबा’ अशी थेट सूचना देत असल्याचे दिसत आहे. मतदान केंद्रातील गोपनीयतेच्या नियमांचे खुलेआम उल्लंघन केल्याच्या आरोपाने या प्रकरणाची तीव्र चर्चा रंगली आहे.
आज सकाळी स्वतःचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बांगर मतदान केंद्रावर पोहोचले. मात्र, मतदान करतानाच त्यांनी “बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो”, “एकनाथ भाई शिंदे तुम आगे बढ़ो” अशा घोषणा दिल्या. मतदान केंद्रात घोषणाबाजी करणे, मोबाईल फोन वापरणे किंवा कुठल्याही प्रकारे निवडणूक गोपनीयतेचा भंग करणे हे आचारसंहितेचे गंभीर उल्लंघन मानले जाते. त्यामुळे बांगर यांच्या या कृत्यावर निवडणूक विभागाकडून कारवाईची मागणी होत आहे.
हेही वाचा : Nagar Parishad Voting LIVE: 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी आज मतदान, पाहा कुठे-कुठे होणार नाही मतदान
याच मुद्द्यावर भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी बांगर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, “संतोष बांगर यांनी मतदान केंद्रात जाऊन घोषणा करणे आणि एका महिलेला कोणते बटण दाबायचे ते सांगणे ही लोकशाहीला काळीमा फासणारी कृती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मतदानाच्या अधिकारानुसार निवडणूक भयमुक्त आणि स्वच्छ व्हायला हवी. परंतु येथे नियमांचा सरळ भंग केला गेला आहे.”










