Nagar Parishad Voting LIVE: 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी आज मतदान, पाहा कुठे-कुठे होणार नाही मतदान
Nagar Parishad and Nagar Panchayat Election Voting LIVE: राज्यातील 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी आज (2 डिसेंबर) मतदान घेण्यात येत आहे. पाहा याबाबतचे लाइव्ह अपडेट
ADVERTISEMENT

मुंबई: राज्यातील 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज (2 डिसेंबर) मतदान पार पडत आहे. त्यासाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण 12 हजार 316 मतदान केंद्रांसाठी 62 हजार 108 निवडणूक अधिकारी/ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर पोलिसांमार्फत पुरेशा बंदोबस्ताची देखील व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 264 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी आज मतदान होईल. संपूर्ण निवडणूक प्रकियेसाठी पुरेशा मतदान यंत्रांची (EVM) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात एकूण 17 हजार 367 कंट्रोल युनिट, तर 34 हजार 734 बॅलेट युनिटचा समावेश आहे. अधिकारी/ कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली मतदान पथके मतदान केंद्रावर सुरळीत पोहचली आहेत. आज सकाळी 7.30 वाजता मतदानास सुरुवात होईल आणि सांयकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असेल.
राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील असलेल्या प्रकरणांचा निर्णय 23 नोव्हेंबर 2025 रोजी किंवा त्यानंतर आल्याने 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाच्या आणि सदस्यपदांच्या निवडणुकांसाठी आज मतदान होणार नाही.
तेथे सुधारित कार्यक्रमानुसार 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे आता उर्वरित 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान होईल. त्यातील 76 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील न्यायालयीन प्रकरणांमुळे बाधित 154 जागांसाठीदेखील मतदान होणार नाही. तिथेही सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित बाधित जागांसाठी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होईल.










