मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आज (4 ऑक्टोबर) मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना UBT चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाला आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचीही साथ मिळणार असल्याने विरोधकांच्या एकजुटीला मोठं राजकीय बळ मिळालं आहे. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात मोर्चात सहभागी होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही मोर्चात सहभागी होण्यासोबतच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत.
ADVERTISEMENT
राज-उद्धव यांनी स्वतः फोन करून दिलं निमंत्रण
या मोर्चासाठी ठाकरे बंधूंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना स्वतः फोन करून सहभागी होण्याचं निमंत्रण दिल्याची माहिती आहे. त्यामुळे सुरुवातीला असलेली राजकीय मतभिन्नता बाजूला ठेवून विरोधक एकाच व्यासपीठावर येताना दिसणार आहेत.
हे ही वाचा>> 'आम्ही ग्यानेश कुमारांना सवाल विचारतोय, भाजप का उत्तर देतोय?', शिवसेना नेत्याचा BJP ला बोचरा सवाल
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ४ ऑक्टोबरच्या मोर्चाची घोषणा करताना इतर राजकीय पक्ष आणि नागरिकांनाही सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. मोर्चामध्ये पक्षीय झेंडे न वापरता केवळ तिरंगा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काँग्रेस राज ठाकरेंसोबत व्यासपीठ शेअर करणार?
या मोर्चाच्या आधी काँग्रेसच्या भूमिकेबाबत मोठी चर्चा सुरू होती. विशेषतः राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय आणि यूपी-बिहारी नागरिकांच्या मुद्द्यावर यापूर्वी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेस राज ठाकरेंसोबत एकाच व्यासपीठावर येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती.
हे ही वाचा>> ग्यानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आज ठाकरे बंधूंचा एल्गार! राज-उद्धव ठाकरे एकत्र, मुंबईत महामोर्चा
मात्र, आता काँग्रेसने या राजकीय मतभेदांपेक्षा निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनाला महत्त्व देण्याचा निर्णय घेतल्याचं चित्र आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या सहभागाकडे विशेष राजकीय संदेश म्हणून पाहिलं जात आहे.
निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमारांविरोधात आवाज
ठाकरे बंधूंच्या या मोर्चाचा मुख्य मुद्दा निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील भूमिका हा आहे. मतदार यादीतील कथित अनियमितता आणि Special Intensive Revision म्हणजेच SIR प्रक्रियेवरून विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यावर विरोधकांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यामुळे आजच्या मोर्चात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सहभाग हा केवळ आंदोलनापुरता मर्यादित न राहता आगामी महाराष्ट्राच्या राजकारणातील विरोधकांच्या एकजुटीचा महत्त्वाचा संकेत मानला जात आहे.
मतभेद बाजूला, निवडणूक आयोगाविरोधात एकजूट
विशेष म्हणजे राज ठाकरे आणि काँग्रेस यांच्यातील अनेक राजकीय मुद्द्यांवर मतभेद राहिले आहेत. तरीही निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावर काँग्रेसने ठाकरे बंधूंच्या आंदोलनाला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
ADVERTISEMENT












