रोहिदास हातागळे, बीड: "ज्या घटनेशी माझा काही संबंध नव्हता, त्या घटनेवरून सलग 250 दिवस इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझी ट्रायल चालली. त्या दिवसांत मी दोनदा मरता-मरता वाचलो. आज मी तुमच्या आशीर्वादामुळेच तुमच्यासमोर उभा आहे," अशा शब्दांत माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी आपली खंत व्यक्त केली.
ADVERTISEMENT
परळी तालुक्यातील बोधेगाव येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्याला मागील काही दिवसात कसा त्रास झाला हे सांगितलं.
नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे?
आपल्या भाषणात धनंजय मुंडे म्हणाले, "त्या कठीण काळात मी कुठल्याही माध्यमांवर बोललो नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो, मी सगळ्या आजारांतून बाहेर पडलो आहे, फक्त आता डोळ्याचे थोडे बाकी आहे. पण मी जन्माला आलो तोच लोकांची सेवा करायला, म्हणून मी आज तुमच्यासमोर आहे. मला फक्त तुमची सेवा करायची आहे, दुसरे काही नाही."
हे ही वाचा>> 'CM फडणवीसांनी मुंडेंना स्वत: जाऊन सांगितलं आता राजीनामा द्या', सुरेश धसांनीच सांगितली Inside स्टोरी
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील विजयाचा उल्लेख करताना ते म्हणाले, "या निवडणुकीत मायबाप जनतेने मला 1 लाख 42 हजार मतांच्या प्रचंड आघाडीने निवडून दिले. मते घ्यायला महाराष्ट्रात आपण एक नंबरला आहोत. मात्र, एवढा मोठा विजय मिळूनही आपल्याला तो साजरा करता आला नाही. मिळालेल्या मंत्रिपदाचाही आनंद घेता आला नाही. जी संकटं आली, ती अचानक आलेली संकटं होती आणि घडवून आणलेल्या संकटांमधून बाहेर पडणे कठीण असते," असं म्हणत धनंजय मुंडेंनी विरोधकांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
'दोनदा वाचलो.. एवढ्यासाठी देवाने वाचवलं की, असंख्य लोकांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी असले तरी लोकांची सेवा केल्याशिवाय तू जाऊ शकत नाही.. म्हणून आज मी तुमच्यासमोर आहे.'असंही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
हे ही वाचा>> Santosh Deshmukh Case : आरोपी फक्त 8 नाही, मुंडेंचा राजीनामा म्हणजे शेवट नाही? घडामोडींचा अर्थ काय?
दरम्यान, या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांच्या हस्ते बोधेगाव परिसरातील विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, माजी आमदार संजय दौंड, बाळासाहेब दौडताले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ADVERTISEMENT
