जम्मू-काश्मीर: भारत आणि पाकिस्तानमधील 86 तास चाललेले युद्ध शनिवारी (10 मे) संध्याकाळी 5 वाजता संपल्याची घोषणा स्वत: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीवर सहमती झाली आहे असं ट्वीटही त्यांनी केलं होतं. पण त्यानंतर अवघ्या 3 तासांतच पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला युद्धबंदीचा अर्थ समजतो का? असा सवाल विचारला जात आहे.
ADVERTISEMENT
ट्रम्प यांच्या घोषणेनंतरही पाकिस्तान सुधारलं नाही, भारतावर पुन्हा एकदा हल्ला
जम्मू आणि काश्मीरमध्ये सीमेपलीकडून पाकिस्तानच्या प्रक्षोभक कारवाया पुन्हा एकदा तीव्र झाल्या आहेत. शनिवारी रात्री, पाकिस्तानने अनेक भागात युद्धबंदीचे उल्लंघन केले आणि जोरदार गोळीबार केला, तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात एका संशयित ड्रोनचा स्फोट झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने अखनूर, राजौरी आणि आरएस पुरा आंतरराष्ट्रीय सीमेवर आर्टिलरी फायरिंग सुरू केली आहे. त्याचवेळी बारामुल्लामध्ये ड्रोन हल्ला देखील झाला आहे. जम्मूच्या पालनवाला सेक्टरमध्येही पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
दरम्यान, याचे काही व्हिडिओ देखील आता समोर आले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ शेअर करत अशी माहिती दिली आहे की, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. तसंच पाकिस्तानकडून सोडण्यात आलेले ड्रोन भारताच्या हवाई संरक्षण दलाने रोखलं आहे. याशिवाय भारतातील इतरही काही भागात पाकिस्तानकडून गोळीबार होत असल्याचं समजतं आहे.
ओमर अब्दुलांनी शेअर केला ड्रोन हल्ल्याचा व्हिडिओ
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी देखील पाकिस्तानकडून गोळीबार आणि ड्रोन हल्ला होत असल्याचं म्हणत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
दरम्यान, आता भारतीय सैन्याला योग्य उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनाला योग्य उत्तर देण्यास सरकारने बीएसएफला सांगितले आहे. या घटनांनंतर जम्मूच्या मोठ्या भागात ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे. बारामुल्लामध्येही वीजपुरवठा खंडित झाला आहे. श्रीनगरमधील अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे.
याशिवाय राजस्थानमधील पोखरणमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रोन येत आहेत. तथापि, हवाई संरक्षण यंत्रणा त्यांना नष्ट करत आहे. तर राजौरीमध्येही गोळीबार झाल्याचे वृत्त आहे.
आज (10 मे) संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. ही माहिती देताना परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी म्हणालेले की, 'आज दुपारी 3.35 वाजता दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये चर्चा झाली. दोन्ही देशांनी संध्याकाळी 5 वाजल्यापासून हवेत, पाण्यातून आणि जमिनीवरून होणारे हल्ले तात्काळ थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. 12 मे रोजी दोन्ही देशांचे अधिकारी पुढील रणनीतीवर चर्चा करतील', असे मिसरी म्हणाले.
ADVERTISEMENT
