कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचार आघाडीने घवघवीत विजय मिळवला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला पराभवाचा सामना करावा लागला. या निकालानंतर सतेज पाटील यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. तसेच महायुतीच्या नेत्यांवर टीका करत पराभवाची कारणंही सांगितली. निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांकडून 25-00 असा विजय होईल, असा दावा केला जात होता. मात्र, प्रत्यक्ष निकालात समविचार आघाडीने बाजी मारल्याने कोल्हापूरच्या राजकारणात या निकालाची चर्चा सुरू झाली आहे. एका बाजूला अनेक मंत्री आणि त्यांची ताकद होती, तर दुसऱ्या बाजूला सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडी होती. या लढतीत दूध उत्पादक आणि ठरावधारकांनी दिलेला कौल महत्त्वाचा ठरल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली.
ADVERTISEMENT
हेही वाचा : ‘घँऽऽ घँऽऽ’...,दुचाकीचा आवाज अन् गोकुळ जिंकताच कोल्हापूर स्टाईलने जल्लोष; पाहा व्हिडीओ
या निकालानंतर सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या पराभवामागील कारणं सांगताना आक्रमक भूमिका घेतली. काही कार्यकर्त्यांच्या मते, निवडणुकीदरम्यान घेतलेल्या शपथा आणि दिलेली आश्वासनं मतदारांना मान्य झाली नाहीत. त्यामुळे ठरावधारकांनी मंत्र्यांच्या पॅनेलला नाकारल्याचा दावा त्यांनी केला. गोकुळ दूध संघात सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य मिळायला हवं, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. दूध उत्पादकांना योग्य न्याय मिळावा आणि संघाचा कारभार पारदर्शक असावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. गोकुळ दूध संघाशी अनेक कुटुंबं जोडलेली आहेत. त्यामुळे या संस्थेचा कारभार सर्वसामान्यांच्या हिताचा असावा, असं कार्यकर्त्यांनी सांगितलं. दूध उत्पादकांच्या प्रश्नांसाठी सतेज पाटील यांनी घेतलेली भूमिका आणि सर्वसामान्य उमेदवारांना दिलेली संधी यामुळे आघाडीला पाठिंबा मिळाल्याचंही त्यांनी म्हटलं.
हेही वाचा : सगळे विरोधात, तरी सतेज पाटील एकटेच भारी! 'गोकुळ'मध्ये कसा फिरवला गेम?
गोकुळ दूध संघ मल्टिस्टेट होऊ नये आणि संघात राजकारणाचा हस्तक्षेप वाढू नये, अशी भूमिका काही कार्यकर्त्यांनी मांडली. मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे कोल्हापूरकरांचा स्वाभिमान दुखावला गेल्याचा आरोपही त्यांनी केला. याच भावनेतून सामान्य दूध उत्पादकांनी सतेज पाटील यांच्या पॅनेलला पाठिंबा दिल्याचा दावा करण्यात आला. एका कार्यकर्त्याने हा विजय कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा असल्याचं म्हटलं. पैशांची आणि इतर आमिषं दाखवली गेली, तरी सामान्य जनता त्यांना बळी पडली नाही, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली. एका बाजूला नेत्यांची मुलं आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य कुटुंबांतील उमेदवार, असं चित्र या निवडणुकीत होतं. गोकुळ हा सर्वसामान्य दूध उत्पादकांचा आणि कोल्हापूरकरांचा संघ राहावा, या भावनेतून मतदारांनी कौल दिल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. सतेज पाटील यांनी प्रचाराच्या काळात जिल्ह्यातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मागील दीड महिन्यापासून त्यांनी प्रचारावर भर दिला होता. त्याचा फायदा निकालात झाल्याचंही समर्थकांनी सांगितलं.
गोकुळ दूध संघाची ही निवडणूक 2026 ते 2031 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी झाली. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचार आघाडीने या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवलं. आता संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी कोणाकडे जाणार, याकडे लक्ष लागलं आहे. प्रचाराच्या सुरुवातीला सतेज पाटील यांनी संस्थापक अध्यक्ष आनंदराव सुयेकर यांचे पुत्र शशिकांत सुयेकर यांना अध्यक्षपद देण्याचा शब्द दिल्याचं सांगितलं जात आहे. मागील निवडणुकीनंतर शेवटच्या वर्षात झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये हसन मुश्रीफ यांचे पुत्र नावेद मुश्रीफ यांना अध्यक्षपद देण्यात आलं होतं. आता नव्या सत्तेत शशिकांत सुयेकर यांना अध्यक्षपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत पुढील निर्णयाकडे लक्ष असेल. या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी केलेले 25-0 विजयाचे दावे फोल ठरल्याची टीका सतेज पाटील यांच्या समर्थकांनी केली. दूध उत्पादकांच्या हिताचे प्रश्न, संघाच्या कारभारातील पारदर्शकता आणि कोल्हापूरचा स्वाभिमान या मुद्द्यांवर मिळालेला विजय असल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT












