Marathwada Graduates Constituency Election : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि उद्धव ठाकरे गटात मोठ्या प्रमाणावर बंडखोरी पाहायला मिळत आहे. शिवसेना (शिंदे गट) आमदार अब्दुल सत्तार आणि संजना जाधव यांनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात जात शरद पवार गटाचे उमेदवार प्रतापसिंग पाटील यांचा प्रचार सुरू केला आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाचे परभणीचे आमदार राहुल पाटील यांनीही पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार बाजूला सारत आपले सख्खे बंधू तथा राष्ट्रवादीचे उमेदवार प्रतापसिंग पाटील यांच्यासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सतीश चव्हाण यांना पाठिंबा जाहीर केलेला असताना, त्यांच्याच पक्षातील आमदारांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे मराठवाड्यातील राजकारण अत्यंत गुंतागुंतीचे बनले आहे.
ADVERTISEMENT
सत्तारांची नाराजी
अब्दुल सत्तार यांनी सातत्याने पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यपद्धतीवर आणि सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीवर उघड नाराजी व्यक्त केली आहे. सत्तार यांनी छत्रपती संभाजीनगर, खुलताबाद आणि कन्नड परिसरात विविध स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन प्रतापसिंग पाटील यांच्या विजयासाठी बैठका घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, महायुतीमध्ये समन्वय साधण्यासाठी आणि वाद मिटवण्यासाठी ठाण्यात वरिष्ठ पातळीवर बैठका होऊनही स्थानिक पातळीवरील हा रोष कमी झालेला नाही. शिरसाट यांनी घेतलेल्या निर्णयांच्या नेमकी उलट भूमिका घेण्याची सत्तारांची जुनीच पद्धत या निवडणुकीतही कायम असून, विरोधक मानल्या गेलेल्या नेत्यांची संपूर्ण फळी सत्तार यांच्यासोबत उभी राहिलेली दिसत आहे.
हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यात दसऱ्याआधी धो धो बरसणार, IMD चा अलर्ट
पक्षश्रेष्ठींसमोर मोठा पेच
या राजकीय नाट्यात केवळ शिंदे गटाचेच नव्हे, तर ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यांनीही पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने दिलीप गुगे यांना अधिकृत उमेदवारी दिली असताना, राहुल पाटील यांनी आपले बंधू प्रतापसिंग पाटील यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे. परभणी जिल्ह्यात ठाकरे गटाचा एकमेव प्रमुख शिलेदार असलेल्या राहुल पाटील यांच्या या भूमिकेमुळे पक्षश्रेष्ठींसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. अमरावती आणि नागपूरमधील बंडखोरीनंतर आता मराठवाड्यातही डॅमेज कंट्रोल करण्यात महायुती आणि ठाकरे गट कितपत यशस्वी ठरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा : अभिनेता टायगर श्राॅफवर जुहूत गोळीबार, घटनेनं परिसर हादरला
पक्षीय पातळीवर कारवाई होणार का?
स्थानिक राजकारणातील या आघाड्या आणि वैयक्तिक संबंध पक्षीय शिस्तीवर भारी पडत असल्याचे या निवडणुकीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. काँग्रेसचे कल्याण काळे आणि इतर स्थानिक नेत्यांचे असलेले संबंध किंवा सत्तार-शिरसाट यांच्यातील अंतर्गत शीतयुद्ध यामुळे मराठवाड्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. महायुतीच्या अधिकृत धोरणाविरोधात जाऊन उघडपणे बंडखोरी करणाऱ्या अब्दुल सत्तार, संजना जाधव आणि ठाकरे गटाच्या राहुल पाटील यांच्यावर पक्षीय पातळीवर काय कारवाई केली जाते आणि पक्षश्रेष्ठी यावर नेमका काय तोडगा काढतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT












