नवी दिल्ली: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (19 नोव्हेंबर) रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांची नवी दिल्लीत अचानक भेट घेतली. जवळपास 50 मिनिटं चाललेल्या या बंद खोलीतील बैठकीत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील (भाजप-शिवसेना शिंदे गट-राष्ट्रवादी अजित पवार गट) अंतर्गत सुरू असलेल्या फोडाफोडी आणि वाद यावर चर्चा झाली. या फोडाफोडीच्या राजकारणामुळे महायुतीमधील संबंध ताणले गेले असल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी अमित शाहांना दिली आहे.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदेंनी अमित शाहांकडे कोणाची केली तक्रार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे थेट तक्रार केली असल्याचं समजतं आहे. सूत्रांच्या मते, यावेळी एकनाथ शिंदेंनी शाहांना असं सांगितलं की, “विधानसभा निवडणुकीत महायुतीने अभूतपूर्व विजय मिळवला. त्याच जोरावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही युतीसाठी अत्यंत पोषक वातावरण आहे. मात्र काही नेते महत्त्वाकांक्षेमुळे हे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे विरोधकांना आयतं कोलीत मिळतंय. मीडियात नाहक उलटसुलट बातम्या येत आहेत. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. युतीच्या विजयी घोडदौडीत विनाकारण अडथळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.”
हे ही वाचा>> 'एखाद्या माणसाचा पक्ष बळकावून घेताय..', राज ठाकरेंच्या पत्नी कोणावर भडकल्या?
शिंदे यांनी यावेळी पुढेही शाहांना स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “काही नेते वैयक्तिक स्वार्थापोटी काम करत आहेत त्यांच्याकडून अशा पध्दतीने काम यापुढे होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. तसेच युतीतल्या नेत्यांनी एकमेकांवर टीका टाळली पाहिजे. भाष्य करताना प्रत्येकाने संयमाची आणि सामंजस्याची भूमिका घेणे अपेक्षित आहे.”
फडणवीसांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना फटकारल्यावर, शिंदेंची तात्काळ शाहांकडे धाव
दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्या या बैठकीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारण कालच (18 नोव्हेंबर) पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेना मंत्र्यांनी दांडी मारून नेते फोडाफोडीचा निषेध केला होता. ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली होती.
हे ही वाचा>> 'आज परत कोणीतरी गावी जाणार…' भाजपने शिंदेंचे नेते फोडताच आदित्य ठाकरेंनी डिवचलं, भलं मोठं ट्वीट अन्...
दरम्यान, शिवसेनेच्या मंत्र्यांच्या या तक्रारीनंतर फडणवीसांनी त्यांनाच खडे बोल सुनावले होते. 'शिवसेनेने उल्हासनगर आणि कोल्हापूरमध्ये भाजपच्या नेत्यांची फोडाफोडी करून या सगळ्याला सुरूवात केली होती.' असं म्हणत फडणवीसांनी शिवसेना मंत्र्यांवरच संताप व्यक्त केला होता.
या घडामोडीनंतर आज एकनाथ शिंदे यांनी तात्काळ दिल्ली दौरा करत थेट अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे महाराष्ट्रात महायुती सारं काही आलबेल नसल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे आता या सगळ्या वादाबाबत अमित शाह हे मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्यातील भाजप नेत्यांना कोणत्या सूचना देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT











