जळगाव : शहरातील अक्सानगर परिसरात शुक्रवारी सकाळी घडलेल्या भीषण दुर्घटनेने परिसर शोकाकुल झाला आहे. विजेचा धक्का बसलेल्या नऊ वर्षीय मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात तिच्या मामाचा आणि चुलत बहिणीचा मृत्यू झाला असून मुलगी गंभीर जखमी आहे. ही घटना सकाळी अंदाजे सव्वादहा वाजण्याच्या सुमारास घडली.
ADVERTISEMENT
मृतांमध्ये साबीर खान नवाज खान (वय 35) आणि त्यांची मुलगी आलिया साबीर खान (12) यांचा समावेश असून जखमी मुलीचे नाव फातिमा मारिया (9) आहे. फातिमाला तत्काळ खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून ती उपचार घेत आहे.
हेही वाचा : जामखेड : नृत्यांगणा दिपाली पाटीलची लॉजवर गळफास घेऊन आत्महत्या, भाजप नेता मुख्य आरोपी असल्याने खळबळ
स्थानिकांच्या माहितीनुसार, फातिमा सकाळी घराबाहेर लोखंडी वस्तू घेऊन खेळत होती. खेळता–खेळता ही वस्तू शेजारील विद्युत वाहिनीला स्पर्श झाली आणि क्षणार्धात विजेचा प्रचंड प्रवाह तिच्या अंगावर उतरला. फातिमा ओरडल्याचा आवाज घरात पोहोचताच तिचे मामा साबीर खान घराबाहेर धावत आले. भाचीला विजेच्या तडाख्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र विजेचा तीव्र प्रवाह त्यांच्या अंगावरूनही गेला आणि ते काही अंतरावर फेकले गेले.
घटनेचा हा सारा गोंधळ पाहून आलिया बाहेर आली. काय घडत आहे हे समजून घेण्यापूर्वीच ती विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आली. विजेचा धक्का इतका जोरदार होता की साबीर आणि आलिया या दोघांचा जागीच मृत्यू झाला. फातिमा मात्र गंभीर अवस्थेत असून तिच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतांची पंचनामा करण्यात आला असून एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. परिसरातील नागरिकांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून उघड्या विद्युत वाहिन्यांबाबत निष्काळजीपणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. ही दुर्घटनेने एका कुटुंबावर दुहेरी शोककळा कोसळल्याने अक्सानगर परिसरात शोकाकुल वातावरण आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











