Devendra Fadaanvis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (6 मार्च) राज्याचा 2026-27 चा अर्थसंकल्प मांडणार आहेत. त्यांचा हा आतापर्यंतचा दुसरा अर्थसंकल्प असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर फडणवीसांना अर्थ खात्याची जबाबदारी स्वत:कडे घेतली होती. या अर्थसंकल्पातून राज्याला काय मिळणार, लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या रकमेत वाढ होणार का याकडे सबंध राज्याचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT
लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी?
महाराष्ट्राच्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले होते. यासाठी कारणीभूत ठरली ती मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना या योजनेला सुरुवात झाली होती. या योजनेमार्फत राज्यातील 21 ते 65 या वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपयांचा हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. निवडणुकीनंतर हा हप्ता 2100 रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. मात्र त्यामध्ये अजूनही वाढ करण्यात आलेली नाही. या अर्थसंकल्पात या रकमेत वाढ होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय?
लाडकी बहिण योजनेसोबतच निवडणुकीत महत्त्वाचा ठरलेला मुद्दा म्हणजे शेतकरी कर्जमाफी. निवडून आल्यानंतर महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तताही अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचे डोळे अर्थसंकल्पाकडे लागले आहेत.
राज्याच्या तिजोरीवर ताण
या दोन महत्त्वाच्या गोष्टींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र यासोबतच राज्याच्या विकासाला आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा, सिंचन, मोफत धान्य यासाठी किती निधी देण्यात येतो त्याकडेही लक्ष असणार आहे. मात्र लाडकी बहिण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण आला आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनीदेखील ही गोष्ट मान्य केली होती. त्यामुळे कर्जाचा बोजा आणि विविध योजनांसाठीचा निधी यामध्ये फडणवीसांना कसरत करावी लागणार आहे.
आर्थिक सर्वेक्षण अहवालात सांगितल्याप्रमाणे, मार्चअखेरीस राज्यावरील कर्जाचा बोजा 9 लाख 32 हजार कोटींवर पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच महसुलापेक्षा खर्च अधिक असल्याने महसुली तुटीची अपेक्षा आहे. यामुळे आता कर्ज आणि योजनांवरचा खर्च महायुतीचे सरकार कसे सांभाळणार हे पहावे लागेल.
ADVERTISEMENT











