प्रदीप पुर्णेकरांची कॉन्ट्रॅक्ट किलिंग झाल्याचे आरोप, मिनाक्षी शिंदे यांचे पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर

मुंबई तक

02 Oct 2026 (अपडेटेड: 02 Oct 2026, 01:03 PM)

Meenakshi Shinde on Pradeep Purnekar murder Case : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील आरोपांवर मिनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला. दिशा सालियन प्रकरणाचा संदर्भ देत आदित्य ठाकरेंना अटक का झाली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Meenakshi Shinde on Pradeep Purnekar murder Case

Meenakshi Shinde on Pradeep Purnekar murder Case

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

प्रदीप पुर्णेकरांची कॉन्ट्रॅक्ट किलिंग झाल्याचे आरोप,

point

मिनाक्षी शिंदे यांचे पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर

Meenakshi Shinde on Pradeep Purnekar murder Case :  ठाण्यातील माणपाडा येथे ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांची दोन दिवसांपूर्वी गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्रांनी वार करून हत्या झाली. या प्रकरणात खासदार संजय राऊत यांनी मिनाक्षी शिंदे यांच्यावर कॉन्ट्रॅक्ट किलिंगचे आरोप केले आहेत. या आरोपांना उत्तर देण्यासाठी मिनाक्षी शिंदे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले. 

हे वाचलं का?

हेही वाचा : भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला, देवीची मूर्ती नेत असलेल्या भक्तांवर काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर काय घडलं?

आदित्य ठाकरेंच्या अटकेची मागणी का झाली नाही? : मिनाक्षी शिंदे 

"दिशा सालियन प्रकरणात एफआयआरच्या प्रतीत आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची नावे आहे. दिशा सालियन यांच्या मृत्यूच्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा सहभाग असल्याचे दाखवले जात असताना त्यांना अटक करण्याची मागणी का झाली नाही?" असा सवाल मिनाक्षी शिंदे यांनी उपस्थित केला. माझ्यावर कोणताही ठोस पुरावा नसताना आरोप केले जात आहेत, मात्र दिशा सालियन प्रकरणात नावांचा उल्लेख असूनही कारवाई का झाली नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा : भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला, देवीची मूर्ती नेत असलेल्या भक्तांवर काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर काय घडलं?

माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे, ठोस पुरावे द्यावेत : मिनाक्षी शिंदे 

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी आपले नाव सुरुवातीच्या एफआयआरमध्ये आरोपी म्हणून नव्हते, असा दावा मिनाक्षी शिंदे यांनी केला. त्यानंतर राजकीय नेत्यांनी आपले नाव पुरवणी जबाबात टाकण्यासाठी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोपही त्यांनी केला. एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यावर राजकारण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्या म्हणाल्या. माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असून त्यासाठी ठोस पुरावे द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच राजकीय कारकिर्दीत आपण आपल्या प्रभागातील अनेक लोकांना ओळखत असल्याने एखाद्यासोबतचा फोटो हा गुन्ह्यातील सहभागाचा पुरावा ठरू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावर फिरणाऱ्या ऑडिओ क्लिपबाबतही त्यांनी ती एआयच्या माध्यमातून तयार केलेली असल्याचा दावा केला आणि यापूर्वीच त्याबाबत तक्रार नोंदवल्याचे सांगितले.

पूर्णेकर हत्या प्रकरणातील तपासाबाबत मात्र सध्या कोणतेही भाष्य करणार नसल्याचे मिनाक्षी शिंदे यांनी सांगितले. पोलीस प्रशासन चौकशी करत असून आपण आणि आपले पती राजेंद्र शिंदे चौकशीला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. पूर्णेकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा प्रसंग असताना त्यांना राजकारणात ओढणे योग्य नसल्याचे सांगत, मृत व्यक्तीच्या कुटुंबातील मुलाच्या वक्तव्यांचा राजकीय वापर होऊ नये, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

दरम्यान, क्लस्टरच्या मुद्द्यावरूनही मिनाक्षी शिंदे यांनी प्रदीप पूर्णेकर यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. पूर्णेकर हे सुरुवातीला क्लस्टरच्या विरोधात होते, मात्र नंतर त्यांची भूमिका बदलल्याचे आपल्याला दिसून आले, असे त्या म्हणाल्या. संजय राऊत यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. आपल्या नावाचा उल्लेख करून राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात पोलीस चौकशी सुरू असल्याने तपासात अडथळा येईल असे कोणतेही वक्तव्य करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात जे काही निष्पन्न होईल ते पोलिसांच्या चौकशीतून समोर येईल, असे मिनाक्षी शिंदे यांनी स्पष्ट केले.