MLA Daulat Daroda's nephew dies of heart attack in jail : ठाणे जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांच्या तांदूळ खरेदी घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (एनसीपी) आमदाराच्या पुतण्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सकाळी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचारादरम्यान हरीश उर्फ भाऊ दरोडा यांचा मृत्यू झाला. पोलिस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. खडकपाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हरीश दरोडा हा शहापूरचे एनसीपी आमदार दौलत दरोडा यांचा पुतण्या होता. तांदूळ खरेदीतील मोठ्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात त्याला 9 डिसेंबर 2025 रोजी अटक करण्यात आली होती. अटकेनंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून तो कल्याण येथील आधारवाडी कारागृहात होता.
ADVERTISEMENT
पोलिसांच्या माहितीनुसार, कारागृहात असताना हरीश दरोडा यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच शुक्रवारी सकाळी त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : Dhoom फेम अभिनेत्रीचं रुपडं पालटलं, चाहत्यांना ओळखताही येईना,पाहा व्हिडीओ; आता दुबईत करते ‘हा’ व्यवसाय
हरीश दरोडा यांच्याविरोधात डिसेंबर 2023 मध्ये किन्हावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहापूर तालुक्यातील सकडबाव खरेदी केंद्रातून सुमारे 5 हजार क्विंटल तांदळाचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हा घोटाळा ठाणे जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळाच्या तांदूळ खरेदी प्रक्रियेत झालेल्या मोठ्या अनियमिततांचा एक भाग असल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिस तपासानुसार, या संपूर्ण घोटाळ्याची रक्कम सुमारे 16 कोटी रुपयांच्या घरात असून, त्यापैकी अंदाजे 1.5 कोटी रुपये हे सकडबाव खरेदी केंद्राशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. हरीश दरोडा हे सकडबाव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांनी आणि इतर आरोपींनी शेतकऱ्यांच्या नावाने बनावट व खोटे बिले तयार करून राज्य सरकार आणि आदिवासी विकास महामंडळाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर हरीश दरोडा काही काळ फरार होते. अखेर गेल्या महिन्यात पोलिसांनी त्यांना अटक केली होती. या प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. दरम्यान, न्यायालयीन कोठडीत असतानाच झालेल्या या मृत्यूमुळे घोटाळा प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि चौकशीवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











