'तुम्हाला सत्ता मिळाल्याचा राग नाही, पण...' राज ठाकरेंची तोफ धडाडली, थेट भाजपच्या माजी मंत्र्याची 'ती' गोष्ट सांगितली!

मुंबई तक

• 01:07 PM • 04 Oct 2026

मुंबईतील गर्जना मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी SIR संपूर्णपणे रद्द करण्याची आणि EVM बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली आहे. निवडणूक प्रक्रिया, मतदारसंख्या आणि सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत राज ठाकरेंनी भाजपला थेट इशारा दिला आहे.

mns chief raj thackeray mumbai garjana morcha sir cancel evm ballot paper demand

राज ठाकरे

Google CTA

मुंबई: निवडणूक प्रक्रिया, मतदारसंख्या आणि SIRच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. मुंबईतील 'गर्जना मोर्चा'मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. 'सत्ताधाऱ्यांना सत्ता मिळाल्याचा राग नाही, पण ती सत्ता ज्या पद्धतीने मिळवली आणि राबवली जात आहे, त्याचा राग आहे,' असं म्हणत राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील SIR संपूर्णपणे रद्द करण्याची आणि यापुढे EVMऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली.

हे वाचलं का?

'2017-18 पासूनच राज ठाकरे सांगत होता...'

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात 2017-18 पासून निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांबाबत आपण आवाज उठवत असल्याचं सांगितलं. त्यावेळी सोनिया गांधींसह अनेक नेत्यांची भेट घेऊन निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिकाही आपण मांडली होती, असा दावा त्यांनी केला.

'असा कोणता विजय असतो की विजयानंतर सन्नाटा?'

2024च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरही राज ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केला. 'महाराष्ट्रात सन्नाटा होता. असा कोणता विजय असतो की विजयानंतर पूर्णपणे सन्नाटा?' असा सवाल त्यांनी केला.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत 40 ते 60 लाख मतदार वाढल्याचा दावा करत त्यांनी मतदारसंख्येवरूनही सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. यावेळी त्यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत 'असा कोणता व्हायग्रा आहे की दणादण मतदार वाढतायेत?' असा टोला लगावला.

'सत्ता मिळवली याचा राग नाही, पण...'

सत्ताधारी पक्षावर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, सत्ता मिळवली याचा विरोधकांना राग नाही; मात्र सत्ता कोणत्या पद्धतीने मिळवली जाते आणि तिचा वापर कसा केला जातो, यावर आक्षेप आहे.

देशात आणि महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांना पूर्वीप्रमाणे जनतेची भीती राहिलेली नाही, असा आरोपही त्यांनी केला. 'प्रत्येक राजकीय पक्षाला भीती असते की आपण चुकीचं वागलो तर जनता मतदान करणार नाही; पण आता ही भीतीच दिसत नाही,' असं ते म्हणाले.

'सत्ता आली की त्याच क्षणापासून जाण्याची सुरुवात'

राज ठाकरेंनी सत्तेच्या राजकारणावरही भाष्य केलं. 'सत्ता यायला ज्या क्षणी येते, त्याच क्षणापासून ती जाण्याची सुरुवात होते,' असं म्हणत त्यांनी भाजपला अप्रत्यक्ष इशारा दिला.

आज भाजप सत्तेत आहे, मात्र भविष्यात दुसरा पक्ष सत्तेत आल्यानंतर त्यानेही याच पद्धतीने कारभार केला तर त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील, असं ते म्हणाले. आगामी पिढ्यांनी कसं जगायचं, हा देखील या मोर्चामागचा महत्त्वाचा प्रश्न असल्याचं त्यांनी सांगितलं.

राज ठाकरेंनी मांडले 'दोन महत्त्वाचे विषय'

भाषणात राज ठाकरे यांनी दोन प्रमुख मागण्या स्पष्टपणे मांडल्या.

  • पहिली मागणी: SIR रद्द करा

महाराष्ट्रात आतापर्यंत झालेला SIR म्हणजेच मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची प्रक्रिया संपूर्णपणे रद्द झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

SIRच्या कायदेशीरतेवर प्रश्न उपस्थित करताना त्यांनी माजी केंद्रीय गृह सचिव आणि माजी भाजप मंत्री आर. के. सिंह यांच्या भूमिकेचा संदर्भ दिला. 

'ही कालची गोष्ट तुम्हाला सांगतो. माजी केंद्रीय गृह सचिव आणि मोदींच्या काळातील भाजपचे माजी मंत्री आर के सिंग यांनी SIR बद्दल काय सांगितलंय ते तुम्ही ऐकून घ्या. आर के सिंग यांच्या मते, 'कलम 21 अंतर्गत जे SIR सुरू आहे.. अपवादत्मक परिस्थितीत कारणे लेखी नोंदवून आणि विशिष्ट मतदारसंघ किंवा भागापुरतं करता येते. त्यामुळे संपूर्ण देशात एकाच वेळी SIR करणं हे बेकायदेशीर आहे. SIR संपूर्ण देशात किंवा राज्यात राबविण्याची कायद्यातच तरतूद नाही. समजा मोठी नैसर्गिक आपत्ती आली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक स्थलांतरित झाले किंवा खूप खोटे मतदार असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या तर आणि तरच SIR केलं जाऊ शकतं. पण इथे सरसकट SIR कशासाठी केलं गेलं?'

असं म्हणत त्यांनी 'संपूर्ण देशात किंवा राज्यात सरसकट SIR करण्याची कायद्यात तरतूद नाही,' असा दावा केला. तसेच विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारसंख्येत वाढ झाल्याचा दावा आणि आता SIRच्या माध्यमातून मोठ्या संख्येने मतदार वगळले जात असल्याचा मुद्दा राज ठाकरेंनी उपस्थित केला.

'SIR मधून 2 कोटी लोक बाहेर काढले, हे कोण आहेत?'

राज ठाकरेंनी SIRमधून '2 कोटी लोक बाहेर काढले' असल्याचा दावा करत, हे लोक नेमके कोण आहेत आणि ते कोणाचे मतदार आहेत, असा सवाल केला. त्यांच्या मते, SIRच्या माध्यमातून मतदारांच्या हक्कावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने ही प्रक्रिया रद्द झाली पाहिजे.

  • दुसरी मागणी: EVM बंद करा, बॅलेट पेपरवर मतदान घ्या

राज ठाकरेंनी दुसरी महत्त्वाची मागणी EVM बंद करून पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची केली.

'या देशातील व्होटिंग मशीन बंद होऊन बॅलेट पेपरवर यापुढे मतदान झालं पाहिजे,' असं ते म्हणाले. SIR रद्द करणं आणि बॅलेट पेपरवर मतदान या दोन मागण्या पूर्ण झाल्या, तर 'दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल,' असा दावा त्यांनी केला.

'उद्या कोणाचीही सत्ता येऊ दे, फरक पडत नाही'

आपली लढाई कोणत्या पक्षाला सत्तेत आणण्यासाठी नसून निवडणूक प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पडावी यासाठी असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. 'उद्या कोणाचीही सत्ता येऊ दे, काही फरक पडत नाही; पण ती योग्य मार्गाने यावी,' अशी भूमिका त्यांनी मांडली.

त्यामुळे मुंबईतील गर्जना मोर्चातून राज ठाकरेंनी SIR रद्द करणे, EVMऐवजी बॅलेट पेपरवर मतदान आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता हे तीन प्रमुख मुद्दे आक्रमकपणे पुढे आणले आहेत. त्यांच्या या भाषणामुळे निवडणूक आयोग, मतदार यादी आणि EVMचा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.