MNS leader Balasaheb Sarvade murder Case : सोलापूर शहरात शुक्रवारी सायंकाळी मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब पांडुरंग सरवदे (वय 35, रा. जोशी गल्ली) यांची भरदिवसा हत्या झाल्याची घटना घडली. बिनविरोध निवडणूक करण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या वादातून सरवदे यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करून त्यांचा खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
मनसेचे शहराध्यक्ष प्रशांत इंगळे याबाबत बोलताना म्हणाले, आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र डॉ. किरण देशमुख यांच्या प्रभागात बिनविरोध निवडणूक होण्यासाठी काही स्तरांवरून दबावतंत्र वापरले जात होते. याच पार्श्वभूमीवर विविध राजकीय गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता.
नेमका वाद काय? हत्या कशामुळे झाली?
डॉ. किरण देशमुख यांच्या प्रभागातून उमेदवारी मिळवण्यासाठी बाळासाहेब सरवदे गट आणि माजी नगरसेवक शंकर शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, भाजपकडून शिंदे गटातील शालन शिंदे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. या निर्णयामुळे सरवदे गटात नाराजी पसरली होती. त्याच प्रभागातून मृत बाळासाहेब सरवदे यांच्या चुलत भावाच्या पत्नीने भाजपकडे उमेदवारी मागितली होती, मात्र ती नाकारण्यात आली. उमेदवारी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर सरवदे गटातील काही कार्यकर्त्यांनी माजी नगरसेवक शंकर शिंदे यांच्या संपर्क कार्यालयावर हल्ला करत तोडफोड केल्याचा आरोप आहे. या घटनेबाबत जाब विचारण्यासाठी बाळासाहेब सरवदे संबंधित ठिकाणी गेले होते. याचवेळी दोन्ही गटांमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर सरवदे यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार करण्यात आले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करण्यात आला असून, हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे भाजपमधील उमेदवारीवरून सुरू असलेले अंतर्गत वाद पुन्हा चर्चेत आले आहेत. उमेदवारी नाकारलेल्या इच्छुक आणि बंडखोर गटांमधील नाराजीतूनच हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर सोलापूर शहरात खळबळ उडाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











