आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात अंतर्गत असंतोषाचा भडका, इच्छुकांची अन् उमेदवारांचीही डोकेदुखी वाढली

Mumbai Mahanagar Palika Election : वरळीतील वॉर्ड क्रमांक 196 सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्यानंतर विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांच्या जागी त्यांच्या पत्नी पद्मजा चेंबूरकर यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. मात्र पद्मजा चेंबूरकर या राजकारणात सक्रिय नसतानाही नातेवाईक असल्यामुळे उमेदवारी दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

Mumbai Mahanagar Palika Election

Mumbai Mahanagar Palika Election

ऋत्विक भालेकर

30 Dec 2025 (अपडेटेड: 30 Dec 2025, 02:13 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात अंतर्गत असंतोषाचा भडका

point

इच्छुकांची डोकेदुखी वाढली

Mumbai Mahanagar Palika Election : मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्यासाठी पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरीच्या सुरांमुळे मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे. उमेदवारी वाटपावरून शिवसेना (ठाकरे गट) मधील पदाधिकारी उघडपणे नाराज असून काही ठिकाणी थेट राजीनाम्यापर्यंत परिस्थिती पोहोचली आहे.

हे वाचलं का?

वरळीतील वॉर्ड क्रमांक 196 सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्यानंतर विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांच्या जागी त्यांच्या पत्नी पद्मजा चेंबूरकर यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. मात्र पद्मजा चेंबूरकर या राजकारणात सक्रिय नसतानाही नातेवाईक असल्यामुळे उमेदवारी दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. या वॉर्डसाठी पक्षातील निष्ठावंत पदाधिकारी आकर्शिका बेकल पाटील आणि संगीता जगताप यांच्या नावांची जोरदार चर्चा होती. आकर्शिका पाटील या युवा सेना विभाग अधिकारी असून आदित्य ठाकरेंच्या निवडणुकीत वरळीतील हाय-राईज इमारतींमधील उच्चभ्रू मतदारांची जबाबदारी त्यांच्याकडे होती, तर संगीता जगताप या महिला शाखाप्रमुख म्हणून सक्रिय आहेत. मात्र नेत्यांच्या नातेवाईकांना प्राधान्य दिल्याने निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.

वॉर्ड क्रमांक 193 मध्येही असाच असंतोष दिसून आला आहे. वरळी कोळीवाड्यातील शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी यांनी हरीश वरळीकर आणि आशिष चेंबूरकर यांच्याविरोधात पत्र लिहून पदाचा राजीनामा दिला आहे. 193 वॉर्डमधून सूर्यकांत कोळी इच्छुक होते, मात्र या वॉर्डसाठी माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांना उमेदवारी देण्यात आल्याने नाराजी वाढली आहे.

दरम्यान, वॉर्ड क्रमांक 197 मनसेला देण्यात आल्याने ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकारी संतप्त झाले आहेत. या निर्णयाविरोधात पदाधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला असून, “आम्ही मनसेच्या उमेदवाराचे काम करणार नाही,” असं ठामपणे सांगितलंय. 197 वॉर्डमधील नाराजी दूर करण्यासाठी ठाकरेंचा उमेदवार मनसेच्या चिन्हावर लढवावा, अशी विनंती ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेला करण्यात आल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एकीकडे विरोधकांशी लढा आणि दुसरीकडे स्वपक्षातील असंतोष या दुहेरी आव्हानामुळे आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील राजकीय गणित अधिकच गुंतागुंतीचे होत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं, मुंबईत भाजपात पहिला राजीनामा पडला, पत्र लिहित खदखद बोलून दाखवली

    follow whatsapp