Exclusive: ...तर थेट जन्मठेप! तुकाराम मुंढेंचा मोठा इशारा, दूधात भेसळ करायचा विचार विसरून जा!

अभिजीत करंडे

• 09:55 PM • 13 Jul 2026

'कायदा एवढा सक्षम आहे की, यामध्ये जर अनसेफ फूड आलं तर त्याला थेट जन्मठेपेची शिक्षा आहे. होय.. जन्मठेपेची शिक्षा आहे.' असा थेट इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांना दिला आहे. मुंढेंनी मुंबई Tak ला दिलेल्या विशेष मुलाखतीत यासंबंधी अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे.

mumbai tak exclusive interview sell hazardous food and face life imprisonment tukaram mundhe issues a strong warning think twice before adulterating milk

तुकाराम मुंढे यांची मुंबई Tak वर एक्स्क्लुझिव्ह मुलाखत

Google CTA

मुंबई: राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीविरोधात अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाने मोठी मोहीम सुरू केली असून, लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. घातक आणि भेसळयुक्त अन्नपदार्थ विकल्यास संबंधितांवर थेट जन्मठेपेपर्यंतची कारवाई होऊ शकते, अशी स्पष्ट चेतावणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मुंबई Tak ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली.

हे वाचलं का?

मुंढे म्हणाले की, 'राज्यभर तपासण्या मोठ्या प्रमाणात वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवर यावेळी अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यासाठी सर्व डेअरी चालक, दूध संकलन केंद्रांचे प्रतिनिधी आणि दुग्ध उद्योगातील संबंधितांना एकत्र बोलावून बैठक घेण्यात आली.'

त्यांच्या म्हणण्यानुसार, 'FDA च्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत उद्योगातील संबंधितांना सर्व नियम समजावून सांगण्यात आले आणि नियमांचे उल्लंघन केल्यास काय परिणाम होऊ शकतात, याचीही सविस्तर माहिती देण्यात आली.'

'महाराष्ट्रातील 32 टक्के दूध नमुने असुरक्षित'

तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, 'बैठकीदरम्यान आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणातील आकडेवारीही संबंधितांना दाखवण्यात आली. या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रातील तपासण्यात आलेल्या दूध नमुन्यांपैकी जवळपास 32 टक्के नमुने 'अनसेफ' (Unsafe) आढळले आहेत. ही आकडेवारी अत्यंत चिंताजनक असून, यामुळे दूध भेसळीचा प्रश्न किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते.'

हे ही वाचा>> मुंबईतील प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रिमचा परवाना रद्द, तुकाराम मुंढेंच्या निर्देशानंतर मोठी कारवाई

दुधात पाणीच नव्हे तर घातक पदार्थांचाही वापर

मुंढे पुढे म्हणाले की, 'राज्यात अनेक ठिकाणी डेअरी, दूध संकलन केंद्रे आणि चिलिंग सेंटर बंद झाल्याचे आढळून आले आहे. तपासणीदरम्यान अनेक प्रकारचे गैरप्रकार समोर येत आहेत.'

त्यांच्या म्हणण्यानुसार, 'दुधात पाणी मिसळल्यास ते 'सबस्टँडर्ड' ठरते. काही ठिकाणी दुधात आरोग्यासाठी घातक रसायने किंवा अन्य पदार्थ मिसळल्याचेही आढळते. अशा प्रकारचे प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. तुम्ही थेट लोकांच्या जीवाशी खेळत आहात. हा केवळ नियमभंग नसून सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर गुन्हा आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.

घातक अन्नपदार्थ विकल्यास थेट जन्मठेपेची तरतूद

तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, ''अन्न सुरक्षा कायद्यात घातक आणि जीवाला धोका निर्माण करणारे अन्न विकणाऱ्यांविरोधात अत्यंत कठोर तरतुदी आहेत. त्यांनी जर एखादे अन्न अनसेफ फूडच्या श्रेणीत येत असेल आणि त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असेल, तर संबंधितांवर गुन्हा दाखल करून न्यायालयात खटला चालवला जातो. अशा प्रकरणांमध्ये जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे."

हे ही वाचा>> Pune Metro : तुकाराम मुंढेंचा कॉल.. दुकानाला सील आणि पुण्यात पेढ्यांचा कहर

व्यवसायिक आणि नागरिकांनीही सतर्क राहावे

मुंढे यांनी नागरिकांसह अन्न व्यवसाय करणाऱ्यांनाही जबाबदारीची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, 'एखाद्या व्यवसायिकाची एक चूक त्याचा संपूर्ण व्यवसाय बंद पाडू शकते. त्याहून महत्त्वाचे म्हणजे तीच चूक एखाद्या नागरिकाच्या जीवावर बेतू शकते.'

त्यामुळे दूध किंवा इतर कोणत्याही खाद्यपदार्थामध्ये भेसळ करणे हा केवळ आर्थिक गुन्हा नसून तो मानवी जीवाशी संबंधित अत्यंत संवेदनशील विषय असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

FDA चा स्पष्ट संदेश

अन्न व औषध प्रशासनाने आता दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवरील तपासणी अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या डेअरी, दूध संकलन केंद्रे, चिलिंग सेंटर आणि इतर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा विभागाने दिला आहे. लोकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश FDA ने या मोहिमेद्वारे दिला आहे.