Uddhav Thackeray : “शरद पवार यांना संधी साधता आली असती”, ठाकरेंचे चिमटे

भागवत हिरेकर

01 Aug 2023 (अपडेटेड: 01 Aug 2023, 09:20 AM)

नरेंद्र मोदी यांना टिळक पुरस्कार करणार प्रदान. शरद पवार राहणार उपस्थित. उद्धव ठाकरेंनी सामनातून केली टीका.

shiv sena ubt slams ncp president sharad pawar over narendra modi tilak award

shiv sena ubt slams ncp president sharad pawar over narendra modi tilak award

follow google news

Narendra modi pune visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. या पुरस्कारावरून विरोधकांमध्येच नाराजी नाट्य रंगलं आहे. मोदींच्या पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असणार आहे. पवारांच्या याच उपस्थितीवरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने चिमटे काढले आहेत. (PM Narendra Modi pune visit : shiv Sena UBT hits out at NCP President Sharad Pawar)

हे वाचलं का?

टिळक पुरस्काराच्या निमित्ताने शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर दिसणार आहेत. यावर सामना अग्रलेखातून भाष्य केले गेले आहे. शरद पवार यांच्या भूमिकेवर बोट ठेवत ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे पवारांवर टीकेचे बाण डागले आहेत.

शरद पवार-नरेंद्र मोदी : शिवसेनेने (युबीटी) ‘सामना’त काय म्हटलंय?

ठाकरेंनी सामना अग्रलेखात म्हटलं आहे की, “मोदी भेटीत भाजप स्वतःचीही महाआरती करून घेईल. हे सर्व ते करतील याबाबत कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही, पण पुरस्कार सोहळय़ात श्रीमान शरद पवार हे खास व्यासपीठावर उपस्थित राहतील व शरद पवारांच्या हस्ते मोदींना पुरस्कार, टिळक पगडी देऊन सन्मानित केले जाईल. वादाची ठिणगी इथे पडली आहे.”

वाचा >> Samruddhi Mahamarg Accident : पूल कसा कोसळला, मृत्यु झालेल्या 17 लोकांची नावं काय?

“मोदी यांना टिळक पुरस्कार देऊ नये असे अनेकांचे सांगणे होते; पण टिळक कुटुंब हे बरेचसे भाजपमय झाले. त्यामुळे टिळकांच्या विचारांशी संबंध नसलेल्यांनाही पुरस्कार दिले जात आहेत. अर्थात विचारभिन्नता असली तरी कर्तबगारी, राष्ट्रसेवा त्यांच्या अंगी असेल तर तो देण्यास हरकत नाही; पण मोदी यांना पुरस्कार देण्यात एकप्रकारची अपरिहार्यता दिसते.”

मोदींच्या नावाची शिफारस आश्चर्यकारक

“टिळकांच्या संघर्षातून मिळालेल्या स्वराज्यास गुलामीच्या बेडय़ांत जखडणाऱ्या नेत्यांना टिळकांच्या नावाचा पुरस्कार देणे, त्या पुरस्कारासाठी अशा नावाची शिफारस करणे हे आश्चर्यच आहे. अशा वेळी टिळकांचेच एक वचन आम्हाला आठवते, ‘असा कोणताही धंदा किंवा आश्रम नाही की लबाडांनी किंवा अयोग्य पुरुषांनी त्यात आपला प्रवेश करून घेतला नाही. मग तो राज्य करण्याचा धंदा असो की भीक मागण्याचा धंदा असो.’ टिळकांनी जे सांगितले ते आता रोज घडत आहे”, असं सामनातून ठाकरेंनी म्हटलं आहे.

‘मोदींना चीड असती तर…’

– “पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. शरद पवारांचे लोक भ्रष्टाचारी व लुटारू आहेत, असे त्यांनी हजारो कोटींचे आकडे देऊन सांगितले. आज टिळक पुरस्कार स्वीकारताना हे सर्व भ्रष्टाचारी वगैरे लोक पुण्यात मोदींच्या मांडीस मांडी लावून बसणार आहेत व शरद पवार हे तर मोदींचा सन्मान करतील. ते या सोहळ्याचे मुख्य अतिथी आहेत. पंतप्रधानांना भ्रष्टाचाराच्या संदर्भात थोडी जरी चीड असती तर ‘अशा भ्रष्ट वगैरे लोकांच्या हातून मी टिळकांच्या नावे पुरस्कार स्वीकारणार नाही व यापैकी एकही व्यक्ती मंचावर किंवा मंडपात असता कामा नये’, असे त्यांनी आयोजकांना बजावून सांगायला हवे होते.”

Firing: ‘ये सब PAK से ऑपरेट हैं…’, जयपूर-मुंबई ट्रेनमधील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

“मोदी हे कालपर्यंत ज्यांना भ्रष्ट मानत होते ते मोदींचा सन्मान करतील. मोदी तो स्वीकारतील. याचा दुसरा अर्थ असा की, मोदी व त्यांच्या लोकांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप खोटेच आहेत व फक्त पक्ष फोडण्यासाठीच त्यांनी हे आरोप केले व लोकांत भय निर्माण केले”

पवारांना संधी साधता आली असती -ठाकरे

शिवसेनेने (युबीटी) पवारांना चिमटा काढताना म्हटलं आहे की, “दुसरे आश्चर्य हे श्रीमान शरद पवारांचे. महिन्यापूर्वी मोदी यांनीच शरद पवारांच्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले व लगेच त्यांचा पक्ष फोडला, महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करून सोडला. तरीही शरद पवार हे पुण्यातील आजच्या कार्यक्रमास हजर राहून मोदींचे आगत स्वागत करणार हे काही लोकांना आवडलेले दिसत नाही. खरे तर लोकांच्या मनात आपल्या विषयी असलेली साशंकता दूर करण्याची चांगली संधी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवून शरद पवार यांना साधता आली असती.”

“आता शरद पवारांचे म्हणणे असे की, तिनेक महिन्यांपूर्वी आपणच त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्याने मला हजर राहावे लागेल; पण पुण्यात येण्याआधी मोदींनी त्यांच्या या विशेष निमंत्रकाचा पक्ष फोडून भाजपमध्ये सामावून घेतला. त्याचा निषेध म्हणून शरद पवार हे गैरहजर राहिले असते तर त्यांचे नेतृत्व, हिंमत यास सह्याद्रीने दाद दिली असती.”

“मोदी पुण्यात असताना तिकडे संसदेत दिल्ली सरकारचे लोकशाही अधिकार खतम करून, सर्वोच्च न्यायालयाचा न्याय तुडवत विधिमंडळाच्या अधिकारावर आक्रमण करणारे विधेयक संसदेत मंजुरीसाठी आणले जात आहे. हे हुकूमशाही वृत्तीचे विधेयक आणणारे मोदी हे स्वातंत्र्याचे सेनानी लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार घेतील व शरद पवार संसदेत विधेयकास विरोध करण्यास हजर राहण्याऐवजी मोदींना पुरस्कार देतील हे पवारांच्या चाहत्यांना आवडणार नाही. देशात स्वातंत्र्याचा दुसरा लढा सुरू आहे. अशा वेळी शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून लोकांच्या वेगळ्या अपेक्षा आहेत”, असा टोलाही ठाकरेंनी पवारांना लगावला आहे.

    follow whatsapp