मोदींच्या पदवी वादात अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीनेही हात झटकले!

मुंबई तक

05 Apr 2023 (अपडेटेड: 05 Apr 2023, 11:43 AM)

नरेंद्र मोदींच्या पदवी वादावर महाविकास आघाडीतच वेगवेगळे सूर आहेत. अजित पवारांनी मांडलेल्या भूमिकेपासून राष्ट्रवादी काँग्रेसने अंतर ठेवलं आहे.

Narendra Modi Degree row : NCP Leader jayant patil sideline from Ajit Pawar statement

Narendra Modi Degree row : NCP Leader jayant patil sideline from Ajit Pawar statement

follow google news

छत्रपती संभाजीनगरच्या सभेत उद्धव ठाकरेंनी अजित पवारांच्या उपस्थितीतच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर डिग्रीवरून हल्लाबोल केला. पण दुसऱ्याच दिवशी अजित पवारांनी मोदींच्या डिग्रीबद्दल वेगळी भूमिका मांडली. अजित पवारांनी अवघ्या 24 तासांतच उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरच बोट ठेवलं. त्यावरून मविआत एकमत नसल्याचं चव्हाट्यावर आलं. पण आता राष्ट्रवादीनेही ठाकरेंच्या भूमिकेची री ओढलीय. कोण काय म्हणालं आणि अजित पवारांच्या भूमिकेपेक्षा राष्ट्रवादीनं कोणती वेगळी भूमिका घेतली, हेच बघुयात.

हे वाचलं का?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीवरून देशभर वाद सुरू आहे. मोदींची डिग्री दाखवा म्हणून अरविंद केजरीवाल आक्रमक झाले. पण, गुजरातमधील न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना 25 हजाराचा दंड ठोठावला. याबद्दलच छत्रपती संभाजीनगरच्या सभेत उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं होतं.

वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले, ते बघा…

उद्धव ठाकरे म्हणाले होते, “देशात लाखो युवक सुशिक्षित आहेत. पदवीधर आहेत. अनेकांची घरची परिस्थिती शिक्षण पूर्ण करण्यासारखी नाही. कर्ज काढून शिक्षण घेतलं. पदवी मिळवलेली आहे. कारण हल्ली असं म्हणतात की, डॉक्टरेट सुद्धा विकत घेता येते. मला कुणाचा संदर्भ द्यायचं नाही. काहीजण पाण्याचं इंजेक्शन घेऊन फिरतात, सोडून द्या त्यांना.”

“अनेक पदवीधर असे आहेत की, पदव्या दाखवूनही त्यांना किंमत मिळत नाहीये. एकाबाजूला देशाची अशी स्थिती आहे की, पदवी दाखवून सुद्धा किंमत मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला पंतप्रधानांची पदवी दाखवायला मागितली, तर 25 हजारांचा दंड होतो. अशी कोणती पदवी आहे त्यांच्याकडे? कोणत्या कॉलेजची आहे? कॉलेजला सुद्धा अभिमान वाटायला पाहिजे की, कॉलेजमध्ये शिकलेला विद्यार्थी देशाच्या पंतप्रधानपदी बसला आहे. हा अभिमान त्या कॉलेजला असला पाहिजे”, असं ठाकरे यावेळी म्हणाले.

अजित पवार मोदींच्या पदवीच्या मुद्द्यावर काय म्हणाले होते?

उद्धव ठाकरेंनी डिग्रीवरून मोदींवर निशाणा साधला. पण ठाकरेंच्या नेमकी उलट भूमिका विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मांडली.

मोदींच्या पदवीबद्दल अजित पवार असं म्हणालेले की, “2014 मध्ये त्यांची डिग्री बघून लोकांनी निवडून दिलं का? त्यांनी 2014 मध्ये देशामध्ये करिष्मा निर्माण केला, जो भारतीय जनता पक्षाचा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नव्हता. त्याचं सर्व श्रेय नरेंद्र मोदी यांना दिलं पाहिजे. आतापर्यंत जे देशाचे पंतप्रधान झाले, राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्यांना बहुमताचा आदर करून त्याला महत्त्व आहे.”

हेही वाचा – ‘…म्हणून उद्धव ठाकरेंना वेगळी खुर्ची’, अजित पवारांनी खरं काय ते सांगून टाकलं!

“केंद्रात 543 ची संख्या आहे, तिथे बहुमत ज्याचं असेल, तो प्रमुख होतो. राज्यामध्ये 146 ज्याचं बहुमत असेल, तो मुख्यमंत्री होतो. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात पदवी असल्याशिवाय काम करता येत नाही, पण असं राजकारणात नाही. त्यामुळे ते 9 वर्ष आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. आता डिग्रीबद्दल काढून… अधूनमधून मंत्र्यांच्या डिग्रीबद्दल काढलं जातं. तो महत्त्वाचा प्रश्न नाही, महत्त्वाचा प्रश्न महागाई आणि बेरोजगारी आहे”, अशी भूमिका अजित पवारांनी मांडली होती.

पवारांच्या या भूमिकेने ठाकरेंच्या मतावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मविआत एकमत नसल्याचं देशभर चर्चा झाली. यानंतर राष्ट्रवादीतून मोदींच्या डिग्रीबद्दल कोणाचीच प्रतिक्रिया आली नाही. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं मोदींच्या डिग्रीबद्दल अधिकृत भूमिका स्पष्ट केलीय. स्वतः प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदींच्या डिग्रीची चिकित्सा होणारच, असं म्हणत अप्रत्यक्षपणे अजित पवारांची भूमिका ही राष्ट्रवादीची नसल्याचं स्पष्ट केलं.

अजित पवारांनी मांडलेल्या भूमिकेवर जयंत पाटील म्हणतात…

जयंत पाटील म्हणाले की, “यात दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे मोदी हे बीए आहेत म्हणून पंतप्रधान केलं, असं नाही. त्यांची पदवी बघून पंतप्रधानपद मिळालं असं नाही. पण, जर मोदींनी त्यांची डिग्री अशी आहे, असं सांगितलं, तर मग त्या डिग्रीबद्दल… शेवटी कुठलीही गोष्ट सार्वजनिक झाल्यानंतर त्याची चिकित्सा होत असते. त्यातून येणाऱ्या प्रश्नांना संबंधितांनी उत्तर देणं अपेक्षित आहे. त्यांच्या पदवीबद्दल चिकित्सा होणं स्वाभाविक आहे. देशात सगळेच प्रश्न त्यावर विचारतात. त्यामुळे पदवीबद्दल लोक आज मोदींना प्रश्न विचारत आहेत”, असं जयंत पाटील म्हणाले. आता अजित पवारांची भूमिका काय हे बघावं लागेल.

    follow whatsapp