OmRaje nimbalkar : महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरने खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील काही खासदार फुटून शिंदेच्या शिवसेनेत सामील होणार असल्याची चर्चा आहे. यातील दोन खासदारांनी नांदेडमधील विमानतळावरुन दिल्ली गाठल्याची माहिती आहे. मात्र, दुसरीकडे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे आणि हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर ठाकरेंसोबत असल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय. या सर्व घडामोडी दरम्यान, निष्ठावंत म्हणवून घेणारे ओमराजे निंबाळकर सर्वात जास्त चर्चेत आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर ओमराजेंचं मौन, आहेत तरी कुठे?
ओमराजे निंबाळकर आहेत तरी कुठे?
ओमराजे निंबाळकर हे काल पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याप्रकरणाचा निकाल लागणार म्हणून मुंबईत आले होते. मात्र, न्यायालयाने या निकालाची तारीख पुढे ढकलली. त्यानंतर ओमराजे मुंबईतून पुण्यात गेले होते. मात्र, काल रात्रीपासून ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरु झाल्यानंतर ते कुठे आहेत? याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. ओमराजेंनी मौन बाळगल्याने ते ठाकरेंसोबत राहणार की शिंदेंच्या गळाला लागणार? हे अजूनही समजू शकलेली नाही. मात्र, दुसरीकडे ओमराजे निंबाळकर यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओमध्ये ते राजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करताना पाहायला मिळत आहेत. याच व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडलाय. लोकं नेमकं काय म्हणत आहेत? जाणून घेऊयात....
हेही वाचा : ‘ऑपरेशन टायगर’ आधीच ठाकरेंचा सगळ्यात मोठा डाव; मध्यरात्रीच जारी केलं ‘ते’ पत्र, अन्…
ओमराजेंच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
"कपाळावर गदारी चा शिक्का लावून घेऊ नका साहेब", अशा प्रकारच्या अनेक कमेंट्स ओमराजे निंबाळकर यांच्या व्हिडीओवर आल्या आहेत. शिवाय , एका नेटकऱ्याने ओमराजेंना आवाहन करण्यासाठी सविस्तर कमेंट केली आहे. नेटकरी म्हणाला, " ओमदादा तुमच्यावर एवढा विश्वास आणि मनातून प्रेम आहे. तुमच्या 2024 च्या निवडणुकीच्या वेळेला तुमच्या विजयासाठी आम्ही 1 /2 लाखांची शर्यत लावायला तयार होतो. तुमच्या वडिलांची हत्या झाल्यावर स्व मुंडे साहेबांनी तुम्हाला हात धरून स्व बाळासाहेबांकडे नेले आणि आमदार केलं. नंतर ठाकरे घराण्याने तुम्हाला खासदार म्हणून निवडून आणलं अजून काय पाहिजे? बाळासाहेब ठाकरे शपथ आहे तुम्हाला...उद्धव ठाकरेंना सोडू नका.", अशा आशयाची कमेंट नेटकऱ्याने केली आहे. आणखी कोणत्या कमेंट्स ओमराजेंच्या व्हिडीओवर आल्या आहेत? हे आपण ओमराजेंनी पोस्ट केलेल्या व्हिडीओच्या खाली पाहू शकतो.
ADVERTISEMENT











