मुंबई: हिंदी भाषा सक्तीविरोधात मनसे आणि शिवसेना UBT यांनी जो एल्गाल पुकारला होता. त्यासाठी मनसेने 5 जुलैला मोर्चाचं आयोजन केलं होतं. मात्र, या मोर्चा आधीच फडणवीस सरकारने त्रिभाषा सूत्राचा जीआर मागे घेतला. त्यामुळे मोर्चाऐवजी ठाकरे बंधूंनी मुंबईत विजयी मेळावा घेण्याचं ठरवलं. ज्यानुसार आज वरळी डोम येथे विजयी मेळावा घेण्यात आला.
ADVERTISEMENT
तब्बल 18 वर्षानंतर मराठीच्या मुद्यावर दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आले. राज ठाकरे यांनी 2006 साली शिवसेनेतून बाहेर पडत मनसेची स्थापना केली होती. तेव्हापासूनच हे दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र कधी येणार? असा सवाल सातत्याने विचारला जात होता.
बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र यावं अशी वारंवार इच्छा प्रकट केली होती. पण ते शक्य झालं नव्हतं. कौटुंबिक समारंभ, उद्धव ठाकरेंचं आजारपण या गोष्टी वगळता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे गेल्या 18 वर्षात राजकीय व्यासपीठावर समान भूमिका घेऊन कधीही एकत्र आले नव्हते. पण अखेर आज (5 जुलै 2025) आवाज मराठीचा असं म्हणत दोन्ही बंधू एकत्र आले. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या मनातलं चित्र आज सत्यात उतरल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
बाळासाहेबांच्या मनातील चित्र, अखेर कॅमेऱ्यात कैद
याच पार्श्वभूमीवर शिवसेना UBT पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक अत्यंत बोलका असा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे याचा एकत्रित असा फोटो आहे. ज्यामध्ये दोघाही भावांनी हात उंचावून समोर जमलेल्या लोकांना अभिवादन करत आहे.
या फोटोच्या वर 'मराठीचा आवाज आणि महाराष्ट्राची ताकद!' असं सूचक कॅप्शनही दिलं आहे.
या कार्यक्रमात केवळ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीच भाषणं झाली. ज्यामध्ये दोन्ही नेत्यांनी मराठीच्या मुद्द्यावरून राज्यातील फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.
मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंची युती होणार?
दरम्यान, आजच्या विजयी मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची देहबोली ही प्रचंड सकारात्मक दिसून आली. त्यामुळे आता या दोन्ही बंधूंची आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत युती होणार का? याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांचा अंदाज घेणं सुरू होतं. मात्र, आता याबाबत अधिक खुलेपणाने चर्चा होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
