शिर्डी : 'गद्दाराला साईबाबा किडे पाडून मारतील..' वाकचौरेंच्या बंडखोरीनंतर शिवसैनिक पेटले

वाकचौरे यांनी बंडखोरी केल्यामुळे शिर्डीतील स्थानिक आणि कट्टर शिवसैनिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या राजकीय घडामोडींनंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर टीका करत आपला रोष व्यक्त केला आहे.

Shirdi MP Bhausaheb Wakchaure

Shirdi MP Bhausaheb Wakchaure

मुंबई तक

18 Jun 2026 (अपडेटेड: 18 Jun 2026, 10:38 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

शिर्डी : गद्दाराला साईबाबा किडे पाडून मारतील..

point

वाकचौरेंच्या बंडखोरीनंतर शिवसैनिक पेटले

Shirdi MP Bhausaheb Wakchaure : गेल्या सहा महिन्यांपासून राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या 'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर, शिवसेनेचे सहा खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील झाल्याची चर्चा आहे. यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचाही समावेश आहे. वाकचौरे यांनी बंडखोरी केल्यामुळे शिर्डीतील स्थानिक आणि कट्टर शिवसैनिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या राजकीय घडामोडींनंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर टीका करत आपला रोष व्यक्त केला आहे.

हे वाचलं का?

साईबाबांची खोटी शपथ घेणारे जीवनातून संपणार

स्थानिक शिवसैनिकांनी वाकचौरे यांच्यावर सडकून टीका करताना सांगितले की, भाऊसाहेब वाकचौरे ज्यावेळी पहिल्यांदा शिवसेनेत आले, तेव्हा ते खासदार झाले होते. त्यानंतर त्यांनी पक्षाशी गद्दारी केली. मात्र, नंतर त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हातपाय जोडून पुन्हा पक्षात घेण्याची विनंती केली. शिवसैनिकांचा तीव्र विरोध असतानाही उद्धव ठाकरेंनी मोठे मन दाखवत, वाकचौरे यांनी साईबाबांची शपथ घेतल्यामुळे त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश दिला. असे असतानाही त्यांनी दुसऱ्यांदा गद्दारी केली आहे. कालच त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत फोनवर बोलताना तीन मिनिटांत चार वेळा साईबाबांची शपथ घेतली होती. साईबाबांची खोटी शपथ घेणारा माणूस कधीच टिकत नाही, भाऊसाहेब वाकचौरे हे आता राजकीय आणि वैयक्तिक जीवनातून पूर्णपणे संपणार, गद्दाराला साईबाबा किडे पाडून मारतील, असा घणाघात शिवसैनिकांनी केला.

हे ही वाचा : ठाणे : बायकोवर नजर ठेवण्यासाठी कॅमेरे, अन् भयंकर घडलं, डॉक्टर पतीला अटक

लबाडाला जनतेने ओळखले

दुसरे स्थानिक कार्यकर्ते सचिनजी यांनी वाकचौरे यांच्या जुन्या कारभारावर बोट ठेवत घणाघाती आरोप केले. ते म्हणाले की, ज्यावेळी वाकचौरे मातोश्रीचे पाय चाटत होते, तेव्हाच सामान्य शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना या लबाड माणसाला तिकीट न देण्याची विनंती केली होती. साईबाबा संस्थानचे विश्वस्त असताना त्यांनी तुपात घोटाळा केला होता, असा आरोपही त्यांनी केला. शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी करून वाकचौरे यांना पुन्हा निवडून आणले. कालपर्यंत ज्याला डोक्यावर घेतले होते, त्यालाच आता पायाखाली तुडवायला शिवसैनिक मागे-पुढे पाहणार नाहीत. यापूर्वी जेव्हा त्यांनी अपक्ष आणि काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांना अवघी 5 ते 10 हजार मते मिळाली होती. शिवसैनिकांमुळेच त्यांची ओळख निर्माण झाली होती, हे ते विसरले आहेत.

हे ही वाचा : सेंटर पॉईंट: फुटीर खासदार आणि 'हाचिको' श्वानाची गोष्ट, सत्तेतल्या नेत्यांना झालाय भस्म्या?

मतदारसंघात आल्यास गाडी फोडणार, तोंड काळं करणार

शिर्डीतील बालपणापासून पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या ज्येष्ठ शिवसैनिकांनीही वाकचौरे यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे. वयाच्या या टप्प्यावर तरी त्यांनी पक्षाशी प्रामाणिक राहायला हवे होते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. संतप्त शिवसैनिकांनी थेट इशारा दिला आहे की, भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डी मतदारसंघात येण्यापूर्वी शंभर वेळा विचार करावा. ते मतदारसंघात पाऊल ठेवताच त्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल आणि त्यांची गाडी फोडली जाईल. या गद्दाराला शिर्डीत कुठेही फिरू दिले जाणार नाही. जिथे कुठे वाकचौरे समोर येतील, तिथे शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा आक्रमक पवित्रा स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतला आहे.