मुंबई: मुंबईच्या राजकारणातील प्रभावशाली नेते सचिन अहिर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी थेट विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी देखील अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, या पक्षांतरामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून, विशेषतः मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT
एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते, तीन वेळा आमदार, राज्य सरकारमध्ये मंत्री आणि नंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील महत्त्वाचे नेते अशी ओळख असलेल्या सचिन अहिर यांच्या राजकीय प्रवासाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. पण नेमके सचिन अहिर कोण आहेत? त्यांची राजकीय कारकीर्द कशी राहिली? जाणून घेऊया सविस्तर.
Sachin Ahir Biography: कोण आहेत सचिन अहिर?
सचिन अहिर यांचा जन्म 21 मार्च 1972 रोजी मुंबई येथे झाला. ते माजी आमदार अरुण गवळी यांचे भाचे आहेत. मात्र, त्यांनी स्वतःची राजकीय ओळख केवळ कौटुंबिक पार्श्वभूमीवर निर्माण केली नाही, तर कामगार चळवळ, संघटन कौशल्य आणि जनसंपर्काच्या जोरावर मुंबईच्या राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.
हे ही वाचा>> आधी पवार आता ठाकरेंची साथ सोडली, कोण आहेत सचिन अहिर? आदित्य ठाकरेंची वाट बिकट होणार?
गिरणगावातील कामगारांशी त्यांचा दीर्घकाळ संबंध राहिला आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघासह अनेक कामगार संघटनांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका बजावत कामगारांच्या प्रश्नांसाठी लढा दिला. त्यामुळे त्यांची प्रतिमा 'कामगार नेता' म्हणूनही तयार झाली. याशिवाय ते अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याचे भाचेही आहेत.
Sachin Ahir Political Career: तीन वेळा आमदार ते राज्याचे मंत्री
- सचिन अहिर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून केली.
- 1999: पहिल्याच निवडणुकीत आमदार
- 1999 मध्ये शिवडी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पहिल्यांदाच विजय मिळवत विधानसभेत प्रवेश केला.
- 2004: सलग दुसऱ्यांदा विजय
- 2004 मध्ये पुन्हा शिवडी मतदारसंघातून निवडून येत त्यांनी आपला जनाधार कायम असल्याचे सिद्ध केले.
- 2009: वरळी मतदारसंघातून विजय
- मतदारसंघ पुनर्रचनेनंतर वरळी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली आणि विजय मिळवत तिसऱ्यांदा आमदार झाले.
- राज्यमंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी
- काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात सचिन अहिर यांनी राज्यमंत्री म्हणून अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली.
हे ही वाचा>> मोठी बातमी: पुन्हा एकदा राजकीय भूकंप.. शिंदे काही थांबेनात, उद्धव ठाकरेंचा 'तो' आमदार फोडला अन् थेट...
त्यांच्याकडे विविध काळात गृहनिर्माण, झोपडपट्टी पुनर्वसन, उद्योग, सामाजिक न्याय, पर्यावरण आणि इतर मागास बहुजन कल्याण यांसारखी खाती होती. मंत्री म्हणून त्यांनी मुंबईतील गृहनिर्माण आणि पुनर्वसनाशी संबंधित अनेक निर्णय प्रक्रियेत सहभाग घेतलेला.
2014 मध्ये पराभव, पण राजकीय प्रभाव कायम
2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, त्यानंतरही त्यांचे राजकीय महत्त्व कमी झाले नाही. 2015 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास ठेवत मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती.
2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम, शिवसेनेत प्रवेश
2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलेला. त्या काळात हा राष्ट्रवादीसाठी मोठा राजकीय धक्का मानला गेला होता. शिवसेनेत प्रवेशानंतर त्यांनी संघटनात्मक पातळीवर महत्त्वाची भूमिका निभावली होती. 2022 मध्ये ते विधान परिषदेवर निवडून आले आणि पुढे ठाकरे गटाचे उपनेते म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.
आता पुन्हा पक्षांतर; शिंदे गटात प्रवेश
आता 2026 मध्ये सचिन अहिर यांनी पुन्हा एकदा राजकीय निर्णय घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची साथ सोडली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करत मुंबईतील राजकीय चर्चांना नवे वळण दिले आहे.
विशेष म्हणजे, शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरे गटातील अनेक नेते शिंदे गटात गेले असले तरी सचिन अहिर यांच्यासारख्या मुंबईतील प्रभावी नेत्याच्या पक्षांतराला वेगळे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
मुंबईच्या राजकारणातील प्रभावशाली चेहरा
सचिन अहिर यांचा प्रभाव विशेषतः वरळी, शिवडी, परळ, लालबाग आणि गिरणगाव परिसरात मानला जातो. कामगार संघटना, स्थानिक सामाजिक संस्था आणि विविध मंडळांमध्ये त्यांचे मजबूत नेटवर्क असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा शिंदे गटातील प्रवेश हा शिवसेनेसाठी संघटनात्मक बळकटी देणारा ठरू शकतो.
Sachin Ahir Political Journey: एका नजरेत
1999 – शिवडी मतदारसंघातून प्रथमच आमदार
2004 – सलग दुसऱ्यांदा आमदार
2009 – वरळी मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार
2009 ते 2014 – महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री
2015 – राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष
2019 – राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश
2022 – विधान परिषदेवर निवड
2026 – शिवसेना (UBT) सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश
ADVERTISEMENT











