Sahar Shaikh Profile Story : ठाणे महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेणारा ठरला. या प्रभागातून AIMIM कडून निवडणूक लढवणाऱ्या सहर शेख यांनी दणदणीत विजय मिळवत राजकारणात जोरदार एंट्री केली. विशेष म्हणजे, या विजयासह त्यांनी थेट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करत केलेलं भाषण चांगलंच गाजलं आणि सहर शेख हे नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आलं.
ADVERTISEMENT
ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 30 मध्ये AIMIM ला अभूतपूर्व यश मिळालं. या प्रभागातून AIMIM चे नफिस अन्सारी, सहर युनुस शेख, शेख सुलताना अब्दुल मन्नान आणि डोंगरे शोएब फरिक असे चार उमेदवार विजयी झाले. संपूर्ण प्रभागाने AIMIM ला पसंती दिल्याने मुंब्रा परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचं चित्र आहे. ठाणे महानगरपालिकेत AIMIM चे एकूण पाच उमेदवार विजयी झाले असून, मुंब्र्यात पक्षाचा आवाज अधिक बुलंद झाला आहे.
विजयानंतरचं गाजलेलं भाषण
विजयानंतरच्या सभेत सहर शेख यांनी केलेलं भाषण चांगलंच चर्चेत आलं. त्यांनी थेट जितेंद्र आव्हाड यांना डिवचत, “आपण त्या लोकांच्या अहंकाराच्या चिंधड्या उडवल्या. काहींना वाटत होतं आम्ही त्यांचे गुलाम आहोत, पण आमच्यासाठी फक्त अल्लाह सर्वोच्च आहे. आम्ही कोणाच्या बापाचे मिंधे नाही,” असा जोरदार हल्ला चढवला. पुढे बोलताना त्यांनी, “पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक होईल, तेव्हा यापेक्षा मोठं प्रत्युत्तर द्यायचं आहे. संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाने व्यापून टाकायचा आहे,” असं वक्तव्य केलं. तसेच नोटाला मिळालेल्या मतांचाही उल्लेख करत त्यांनी विरोधकांवर टीका केली.
वडिलांचा राजकीय वारसा आणि आव्हाडांशी वाद
सहर शेख या केवळ नवख्या नेत्या नाहीत, तर त्या राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेल्या आहेत. त्यांचे वडील युनूस शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांना किंवा त्यांच्या मुलीला राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. सहर शेख यांच्या म्हणण्यानुसार, जितेंद्र आव्हाड यांनी आधी त्यांचं नाव जाहीर करून वडिलांना शब्द दिला होता. मात्र नंतर तो शब्द फिरवण्यात आला. “आम्ही आव्हान दिलं नसतं, तर ते आमच्यासाठी चुकीचं ठरलं असतं. अल्लाहला काय उत्तर दिलं असतं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘मुंब्रा हिरवा करू’ वक्तव्यावर स्पष्टीकरण
‘मुंब्रा हिरवा करू’ या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाल्यानंतर सहर शेख यांनी स्पष्टीकरण दिलं. “हिरवा हा आमच्या पक्षाचा रंग आहे. रंग कोणत्याही धर्माशी जोडलेले नाहीत. संविधान कुठेही हिरवा मुस्लिमांचा आणि भगवा हिंदूंचा रंग आहे असं सांगत नाही. माझं वक्तव्य धर्मांध नव्हतं. माझा विचार धर्मनिरपेक्षतेचा आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
इम्तियाज जलील यांनीही केलं कौतुक
AIMIM चे नेते इम्तियाज जलील यांनी सहर शेख यांचं विशेष कौतुक केलं आहे. “सहर ही तरुण, उच्चशिक्षित मुलगी आहे. तिची निवडणूक संपूर्ण देश पाहात होता. ती प्रभावीपणे बोलते. आम्ही तिला मजलिसचा मुंबईतील चेहरा म्हणून पाहतो,” असं त्यांनी सांगितलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आताच निवडून आलेले उद्धव ठाकरेंचे 3 नगरसेवक फोडले, कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदेंची मोठी खेळी
ADVERTISEMENT











