Sangli Politics : जत तालुक्यातील प्रसिद्ध राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव काही अज्ञात सभासदांनी मध्यरात्री बदलल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कारखान्याच्या प्रवेशद्वारावरील कमानीवर ‘राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना’ असा नवीन फलक लावण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात राजकीय चर्चा रंगल्या आहेत. हा प्रकार कोणी आणि कोणत्या हेतूने केला, याबाबत प्रशासन आणि स्थानिक नागरिकांमध्ये तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
ADVERTISEMENT
राजे विजयसिंह डफळे कोण होते?
राजे विजयसिंह डफळे हे जत संस्थानचे शेवटचे राजे होते. इ.स. 1928 ते 1948 या काळात त्यांनी जत संस्थानाचा कारभार पाहिला. त्यांच्या नावाने अनेक संस्था आणि शिक्षणसंस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. या संस्थांपैकी एक म्हणजे साखर कारखाना होय, जो जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मेहनतीतून उभा राहिला होता.
कारखान्याच्या नाव बदलावरून चर्चांना उधाण
मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी फलक बदलल्यानंतर सकाळी काही नागरिकांनी हा प्रकार पाहताच संताप व्यक्त केला. या कारवाईमागे राजकीय हेतू असल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू करण्यात आला असून, जबाबदार कोण आहेत हे लवकरच स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा : मनोज जरांगे पाटलांनी घेतली पंकजा मुंडेंची बाजू, नेमकं काय म्हणाले?
आमदार गोपीचंद पडळकरांनी काही दिवसांपूर्वी दिला होता इशारा
काही दिवसांपूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली होती. “जतचा साखर कारखाना सभासदांचा आहे, तो आम्ही परत मिळवून देऊ. प्रसंगी न्यायालयात किंवा रस्त्यावर उतरून लढा देऊ,” असा इशारा दिला होता. जतच्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा धुराडा यंदा पेटू देणार नाही, असा गर्भित इशारा देखील त्यांनी दिला होता. याच पार्श्वभूमीवर आता झालेला नावबदलाचा प्रकार अधिकच गाजू लागला आहे.
राजारामबापू साखर कारखाना जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. मात्र, आता पडळकरांनी या कारखान्याचा यंदा धुराडा पेटू देणार नाही असा गर्भित इशारा दिला आहे. त्यामुळे हा प्रकार जयंत पाटील यांच्याविरोधातील राजकीय डाव असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. या संपूर्ण घटनेमुळे जत तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, साखर कारखान्याचे नाव पुन्हा मूळ स्थितीत येणार का? आणि जबाबदार कोण ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
इंदापूरातील मदनवाडी गावात गर्भवती महिलेचा चादरीत आढळला मृतदेह, हातावर होता 'त्या' नावाचा टॅटू
ADVERTISEMENT











