sanjay shirsat visit to abhijeet dipke family : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या कुटुंबीयांची शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी घेतलेली भेट आता महायुतीत चर्चेचा विषय ठरत आहे. या भेटीमुळे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त समोर आले असून, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातून संजय शिरसाट यांना फोन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. झी 24 तासने दिलेल्या वृत्तानुसार, या फोनद्वारे शिरसाट यांच्याकडे त्यांच्या भेटीबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले असून, शिंदे यांनी शिरसाट यांची खरडपट्टी काढल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, याबाबत शिवसेनेकडून कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
ADVERTISEMENT
हेही वाचा : राहुल गांधींनी ‘Gen Z’ साठी केलेलं K-Pop स्टाइल आहे तरी काय? Friendship Day निमित्त खास शुभेच्छा!
राजकारण आणि वैयक्तिक नातेसंबंध या दोन वेगळ्या गोष्टी - संजय शिरसाट
संजय शिरसाट हे 26 तारखेला छत्रपती संभाजीनगर येथे अभिजीत दिपके यांच्या घरी गेले होते. त्यावेळी अभिजीत दिपके दिल्लीमध्ये असल्याने ते घरी उपस्थित नव्हते. शिरसाट यांनी दिपके यांच्या आई-वडिलांची भेट घेतली आणि माध्यमांशी संवादही साधला. यावेळी त्यांनी अभिजीत दीपके यांच्या आई-वडिलांशी आपले अनेक वर्षांचे संबंध असल्याचे सांगितले. राजकारण आणि वैयक्तिक नातेसंबंध या दोन वेगळ्या गोष्टी असल्यामुळेच आपण त्यांच्या भेटीस गेलो असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी वाद सुरू असल्यामुळे आपण त्यांना भेटायला गेलो नव्हतो, असेही त्यांनी सांगितले होते.
हेही वाचा : Personal Finance: जुना फ्लॅट विकताना कोणत्या चुकांमुळे होतं सर्वाधिक नुकसान?
महायुतीतील मंत्र्याने दिपकेंच्या घरी जाणे योग्य नाही - भाजपची भूमिका
या भेटीनंतर भाजपमध्ये नाराजी व्यक्त झाल्याचे वृत्त आहे. अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाचा रोख भारतीय जनता पक्ष तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात होता. त्यामुळे अशा व्यक्तीच्या कुटुंबीयांची महायुतीतील एका मंत्र्याने भेट घेणे योग्य नसल्याची भावना भाजपच्या समर्थकांमध्ये आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. पक्ष नेतृत्वाला याबाबत आधी माहिती देणे अपेक्षित होते, असेही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे मत असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीतील समन्वयाचा मुद्दाही पुढे आला असून, या भेटीमुळे भाजपने आक्षेप नोंदवल्याचे सांगितले जात आहे.
भाजपच्या नाराजीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची दखल घेतल्याचे वृत्त समोर आले. त्यांच्या कार्यालयातून संजय शिरसाट यांना फोन करून या भेटीमागील उद्देश काय होता, याबाबत विचारणा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच या भेटीबाबत स्पष्टीकरणही मागवण्यात आल्याचे वृत्त आहे. झी 24 तासने शिंदे यांनी शिरसाट यांना फोनवर झापल्याचेही म्हटले असले, तरी त्याला शिवसेनेकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, बच्चू कडू यांनीही अभिजीत दीपके यांची भेट घेतल्याची चर्चा होत असून, त्यामुळे महायुतीतील वातावरणावर त्याचा परिणाम होणार का, तसेच संजय शिरसाट यांच्या भेटीवरून पुढे काही राजकीय निर्णय घेतले जाणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT











