हिंदी भाषा सक्ती: राज ठाकरेंची मोठी घोषणा, आषाढीच्या मुहूर्तावर मुंबईतून फुंकणार रणशिंग!

शालेय शिक्षणातील हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी आता थेट मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. पाहा मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकं काय म्हणाले.

राज ठाकरेंची मोठी घोषणा (फाइल फोटो, सौजन्य: Instagram)

राज ठाकरेंची मोठी घोषणा (फाइल फोटो, सौजन्य: Instagram)

मुंबई तक

• 02:16 PM • 26 Jun 2025

follow google news

मुंबई: हिंदी भाषा सक्तीविरोधात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पहिलीपासून विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवली जाईल असा आदेश फडणवीस सरकारने जारी केला होता. त्याविरोधात राज ठाकरेंनी सुरुवातीपासूनच आवाज उठवला. आता याचबाबत राज ठाकरेंनी मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. 

हे वाचलं का?

सरकार हिंदी भाषा सक्तीवरून माघार घेत नसल्याचे म्हणत राज ठाकरेंनी आता 6 जुलै 2025 (रविवार) मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. हा सर्वपक्षीय मोर्चा असून यामध्ये कोणाचाही झेंडा नसेल असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. 

'मला बघायचंय की, कोण-कोण मोर्च्यात सामील होतं', पत्रकार परिषदेत राज ठाकरे नेमकं काय-काय म्हणाले?

राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण राज ठाकरे हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

हे ही वाचा>> 7 जुलैला आझाद मैदानावर आंदोलन, हिंदी सक्ती होऊ देणार नाही... मराठीसाठी ठाकरेंनी रणशिंग फुंकलं

याच भेटीनंतर राज ठाकरेंनी तात्काळ पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये बोलताना राज ठाकरे म्हणाले की, 'दादा भुसे यांच्याकडे काही गोष्टींची उत्तरं नव्हती. ते त्याच-त्याच गोष्टी बोलत होते. त्यामुळे माझी जी आधी भूमिका होती तीच आता देखील आहे. माझा या सगळ्या गोष्टीला पूर्णपणे विरोध आहे. हिंदी कोणत्या किंवा इतर कोणत्याही भाषेची सक्ती होऊ देणार नाही. या गोष्टींसाठी मी सर्व पक्षांना आवाहन करतोय की, येत्या 6 जुलैला (रविवार) गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतला आहे.' 

'या संपूर्ण मोर्च्यात कुठेही कोणताही झेंडा नसेल. तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल. आम्ही जे शिक्षण तज्ज्ञ आणि जे इतर साहित्यिक लोकं आहेत त्यांच्याशी आम्ही बोलणार आहोत. माझं पत्र त्यांना जाणार आहे. सर्वांना त्या मोर्चाला बोलावणार आहोत. सर्व पालकांना आम्ही बोलावणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत.' 

'सरकारला एकदा कळू देत की, महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते. महाराष्ट्राने संपूर्ण ताकद 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता दाखवावी. गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा निघेल. रविवार एवढ्यासाठी निवडला आहे की, पालक आणि विद्यार्थ्यांना यायला जमेल.'

हे ही वाचा>> 'हे आजच ठेचायला पाहिजे...' हिंदी सक्तीवरून राज ठाकरे संतापले, 'ते' पत्र आलं समोर!

'बाकीच्या राजकीय पक्षांशी देखील मी बोलणार आहे. त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे. सर्वांनी यात सामील व्हावं. कारण हा जो कट आहे.. याला मी कटच म्हणेन.. महाराष्ट्राचं मराठीपण हे घालविण्याचा जो कट आहे हा उध्वस्त करण्यासाठी मराठी बांधवांनी मोर्चात सहभागी व्हावं.' 

'इथे कोणताही झेंडा नसेल फक्त मराठी हा एक अजेंडा असेल. त्या अजेंडासाठी सर्वांनी मोर्च्यात सामील व्हावं. अशावेळी मला हे ही बघायचंय की, कोण-कोण त्या मोर्च्यामध्ये सामील होत आहेत. राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त इतर कोण-कोण सामील होतायेत ते पाहायचंय.' असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

    follow whatsapp