सांगली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याच्या उंबरठ्यावर असून, विविध राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. इच्छुक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात जनसंपर्क मोहीम सुरू केली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ने राज्यातील पहिल्या नगराध्यक्ष उमेदवाराची घोषणा करून निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी आज (दि.29) सांगली जिल्ह्यातील उरूण-ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केली. या घोषणेमुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरद पवार गटाने नगराध्यक्षपदासाठी पहिला उमेदवार दिल्याची नोंद झाली आहे.
ADVERTISEMENT
उरूण-ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी आनंदराव मलगुंडे यांना उमेदवारी
उरूण ईश्वरपूर येथील पक्षाच्या कार्यालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीदरम्यान पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. “स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सक्षम, अनुभवी आणि प्रामाणिक नेतृत्व आवश्यक आहे. आनंदराव मलगुंडे हे या निकषांवर खरे उतरतात,” असे मत जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
सांगली जिल्ह्यातील उरूण-ईश्वरपूर हा भाग जयंत पाटील यांचा राजकीय गड म्हणून ओळखला जातो. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या गडातूनच पहिला उमेदवार जाहीर करून आगामी निवडणुकांसाठी पक्षाची रणनिती आखली असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षाकडून पाटील यांच्यावर विविध वक्तव्यांमुळे राजकीय टीका होत असली, तरी त्यांनी या टीकेकडे दुर्लक्ष करून थेट निवडणुकीच्या तयारीकडे वळण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
आनंदराव मलगुंडे हे धनगर समाजातील सर्वसामान्य परंतु कार्यक्षम व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी यापूर्वीही नगराध्यक्ष म्हणून कार्य केले असून, नगरपालिकेच्या विकासकामांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. विशेष म्हणजे, या वेळच्या आरक्षणानुसार नगराध्यक्षपद ओबीसी पुरुष उमेदवारासाठी राखीव आहे, त्यामुळे मलगुंडे यांची निवड योग्य आणि रणनीती ठरल्याचे पक्षांतर्गत सूत्रांनी सांगितले. या घोषणेमुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाने निवडणुकीच्या तयारीला अधिकृतपणे प्रारंभ केल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून, जयंत पाटील यांनी पहिला उमेदवार जाहीर करुन रणशिंग फुंकलंय. राज्याच्या राजकारणात या निर्णयाकडे मोठ्या उत्सुकतेने पाहिले जात आहे. आगामी काही दिवसांत इतर शहरांतील उमेदवारांच्या घोषणाही होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणांगणात चुरशीची लढत रंगणार हे निश्चित मानले जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिंदेंची शिवसेना किती जागा लढणार? मंत्र्यांच्या बैठकीतून आकडा समोर
ADVERTISEMENT











