Shivajirao Kardile Passes Away : राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचं निधन झालंय. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्या निधनामुळे नगर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बुऱ्हानगर या गावाचे सरपंच ते आमदार असा त्यांचा प्रवास उल्लेखनीय ठरला. मूळ व्यवसायाने ते दुग्ध व्यवसायिक होते, परंतु समाजकार्यातील सक्रियतेमुळे त्यांनी राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. विशेष म्हणजे, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे होते.
ADVERTISEMENT
शिवाजीराव कर्डिले यांचा राजकीय प्रवास
शिवाजी कर्डिले यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात बुऱ्हानगर गावच्या सरपंचपदापासून केली. त्यानंतर त्यांनी आमदार आणि माजी मंत्री अशी राजकीय शिखरे गाठली. त्यांनी आपल्या कारकिर्दीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशा तिन्ही पक्षांमधून काम केले. 2009 मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली, मात्र त्या वेळी त्यांचा पराभव झाला. 2014 मध्ये ते भाजपच्या उमेदवार म्हणून पुन्हा आमदार झाले. त्याच वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत येऊन त्यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. मात्र 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्या निधनाने केवळ भाजप नव्हे, तर नगर जिल्ह्याच्या सर्वच राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी वाहिली श्रद्धांजली
जितेंद्र आव्हाड म्हणाले, राहुरीचे विद्यमान आमदार श्री.शिवाजीराव कर्डीले यांचे दुःखद निधन झाले.हे दुःख पचवण्याच बळ त्यांच्या परिवाराला मिळो.कर्डीले कुटुंबियांच्या प्रती आम्ही आमच्या शोक संवेदना व्यक्त करतो..! शिवाजीराव कर्डीले यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!
रोहित पवार म्हणाले, राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं अल्पशा आजाराने निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांचं असं अकाली जाण्याने त्यांचं कुटुंब आणि मतदारसंघासह सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकदा आमदार, राज्यमंत्री, अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन आदी विविध पदांवर त्यांनी केलेलं लोकाभिमुख कार्य कायम स्मरणात राहील. हे दुःख पचवण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना मिळो, ही प्रार्थना! आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत!
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
