गणेश जाधव, धाराशिव : तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होताच राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकीदरम्यान प्रचंड टीका, आरोप-प्रत्यारोप आणि वादग्रस्त मुद्द्यांचा सामना करूनही भाजपने तुळजापुरात आपला दबदबा कायम राखल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद गंगणे यांनी तब्बल 1,770 मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला असून, या निकालामुळे भाजपाने तुळजापूरचा राजकीय ‘गड’ अभेद्य असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.
ADVERTISEMENT
तुळजापूर नगरपरिषदेत एकूण सदस्य संख्येच्या तुलनेत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. भाजपाचे तब्बल 18 नगरसेवक विजयी झाले असून, महाविकास आघाडीला केवळ 5 जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निकालामुळे नगरपरिषदेत भाजपाची सत्ता निर्विवादपणे स्थापन होणार हे स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील या विजयाला आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही महत्त्व दिले जात आहे.
मात्र या निवडणुकीत भाजपाला विजय सहज मिळाला असे चित्र नाही. निवडणूक प्रचाराच्या काळात तुळजापूर ड्रग्स प्रकरणाचा मुद्दा चांगलाच तापला होता. ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या उमेदवाराला भाजपाकडून उमेदवारी देण्यात आल्याने विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला होता. भाजपाच्या निर्णयावर नैतिकतेचा प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडीसह इतर विरोधी पक्षांनी प्रचारात हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला होता. याच मुद्द्यावरून भाजपाचे नेते आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावरही विरोधकांकडून आरोपांची झोड उठवण्यात आली होती. विशेष म्हणजे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील विनोद गंगणे यांच्यावर सातत्याने जोरदार टीका केली होती.
या प्रकरणामुळे निवडणूक अटीतटीची होईल, भाजपाला मतदारांचा रोष सहन करावा लागेल, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत होते. मात्र प्रत्यक्ष निकालाने हे सर्व अंदाज फोल ठरवले. वाद, टीका आणि आरोपांवर मात करत भाजपाने मतपेटीतून स्पष्ट जनादेश मिळवला. विनोद गंगणे यांच्या विजयाने पक्षाची संघटनात्मक ताकद, स्थानिक पातळीवरील कामगिरी आणि मतदारांशी असलेले नाते अधिक ठळकपणे समोर आले आहे.
अंतिम निकालानंतर तुळजापुरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असून, हा विजय विकासाच्या मुद्द्यांवर मिळाल्याचा दावा पक्षाकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाल्याने आत्मपरीक्षणाची गरज असल्याचे मत स्थानिक नेत्यांकडून व्यक्त होत आहे.
एकूणच, तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत ड्रग्स प्रकरणासारख्या गंभीर वादग्रस्त मुद्द्यांनंतरही भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवत राजकीय ताकद सिद्ध केली आहे. या निकालामुळे राणा जगजितसिंह पाटील यांचा प्रभाव कायम असल्याचे दिसून येत असून, तुळजापुरातील भाजपाचा ‘गड’ अद्याप मजबूत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











