Uddhav Thackeray on Amit Shah : पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य केले. पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकारांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा 'देशाचे चाणक्य' असा उल्लेख करण्यात आल्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी केवळ "चकणे" असा एक शब्दातील प्रतिसाद दिला. त्यांच्या या उत्तरानंतर खासदार संजय राऊत मोठ्याने हसल्याचे पाहायला मिळाले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यातील 'या' जिल्ह्यांवर अस्मानी संकट, वरुणराजा खवळणार
मोदी-शाह हे स्वतःच्या सरकारविरोधातील असंतोषाचे जनक - ठाकरे
यानंतर उद्धव ठाकरे यांनी पुढे बोलताना लोकमान्य टिळकांचा उल्लेख करत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली. आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी असल्याचे सांगत त्यांनी टिळकांना ब्रिटिशांविरोधातील असंतोषाचे जनक म्हटले जाते, असे नमूद केले. मात्र, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी स्वतःच्या सरकारविरोधातच असंतोष निर्माण केला असून ते स्वतःच्या सरकारविरोधातील असंतोषाचे जनक ठरले आहेत, असे ठाकरे म्हणाले.
हेही वाचा : 'स्वातंत्र्य म्हणजे मनमानी नाही', पुण्यात आल्यावर अजित डोवालांनी टोचले Gen-Z चे कान
विद्यार्थिनींसोबत अत्यंत वाईट वर्तन झाल्याचा आरोप
पत्रकार परिषदेत विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. विद्यार्थ्यांनी वापरलेल्या भाषेवर बोलताना त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांवर अशी वेळ आणणाऱ्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी विद्यार्थ्यांची तसेच त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागितली पाहिजे. विद्यार्थ्यांवर काठीने मारहाण करण्यात आली, छर्रे झाडण्यात आले, अश्रुधूराचा वापर करण्यात आला आणि काही विद्यार्थिनींसोबत अत्यंत वाईट वर्तन झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचाही त्यांनी उल्लेख केला आणि त्या घटनेबद्दल केंद्र सरकारने माफी मागावी, अशी मागणी केली.
देशातील ट्रोलिंग संस्कृतीवरही उद्धव ठाकरे यांनी टीका केली. गेल्या काही वर्षांत सुरू असलेल्या ट्रोलिंगमुळे सार्वजनिक संवादाची पातळी खालावल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांची गाडी अडवणाऱ्या एका मुलीला ज्या पद्धतीने ट्रोल करण्यात आले, त्याचाही त्यांनी उल्लेख केला. माफी मागण्यापेक्षा माफी मागण्याची गरज केंद्र सरकारवर असल्याचे सांगत त्यांनी तरुणांमध्ये निर्माण झालेल्या नाराजीबद्दल चिंता व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या मागण्या साध्या होत्या आणि सुरुवातीलाच संवाद साधला असता तर अशी परिस्थिती टाळता आली असती, असेही ठाकरे यांनी यावेळी म्हटले.
ADVERTISEMENT












