Ulhas Bapat on delimitation bill : मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून देशातील राजकीय वातावरण तापले आहे. केंद्र सरकारच्या प्रस्तावित विधेयकाला घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी विरोध दर्शवला आहे. लोकसभेच्या मतदारसंघांची पुनर्रचना करताना लोकसंख्येचा आधार घेतल्यास दक्षिण भारतातील राज्यांच्या तुलनेत उत्तर भारतातील राज्यांना अधिक जागा मिळू शकतात. त्यामुळे दक्षिण आणि उत्तर भारतातील राजकीय समतोल बिघडण्याची शक्यता आहे. सरकारने यासाठी 50 टक्के जागा वाढवण्याचा फॉर्म्युला आणल्याचे सांगितले जात आहे. या फॉर्म्युल्यानुसार प्रत्येक राज्यातील सध्याच्या लोकसभा जागांमध्ये 50 टक्क्यांनी वाढ होणार आहे. उदाहरणार्थ, उत्तर प्रदेशमध्ये सध्या 80 जागा आहेत. त्यात 50 टक्के वाढ झाल्यास हा आकडा 120 वर जाईल. त्याचप्रमाणे केरळमध्ये सध्या 20 जागा असून त्यात 10 जागांची वाढ होऊन एकूण संख्या 30 होईल. सरकारच्या मते, या पद्धतीमुळे सर्व राज्यांमध्ये समान प्रमाणात जागा वाढतील. मात्र, उल्हास बापट यांनी या पद्धतीमुळे निर्माण होणाऱ्या राजकीय असमतोलाकडे लक्ष वेधले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : डिलिमिटेशनवरुन INDIA आघाडीची खलबतं सुरू, राष्ट्रवादीची मात्र माघार; दिल्लीत नेमकं काय घडतंय?
जागा वाढवल्यास अराजकता निर्माण होऊ शकते - उल्हास बापट
बापट यांच्या मते, जागांची संख्या वाढल्यानंतर उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यांचे लोकसभेतील प्रतिनिधित्व अधिक वाढेल. त्यामुळे भविष्यात संसदेत एखाद्या महत्त्वाच्या विषयावर मतदान झाल्यास उत्तर भारतातील राज्यांना अधिक राजकीय वजन मिळू शकते. याचा परिणाम संघराज्य व्यवस्थेवर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. डिलिमिटेशनच्या चर्चेत खासदारांवरील कामाचा वाढता भार हा मुद्दाही मांडला जात आहे. एका खासदाराला 20 ते 30 लाख लोकांचे प्रतिनिधित्व करावे लागत असल्याने मतदारसंघांची संख्या वाढवण्याची गरज असल्याचा युक्तिवाद केला जात आहे. मात्र, यावर पर्याय सुचवताना बापट यांनी प्रत्येक खासदाराला चार सहाय्यक नेमण्याची घटनात्मक तरतूद करण्याची सूचना केली. खासदारांना कामासाठी पुरेशी मदत उपलब्ध करून दिल्यास मतदारसंघांची संख्या न वाढवताही हा प्रश्न सोडवता येऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लोकसंख्या कमी करणे किंवा लोकसभेतील जागा वाढवणे असे दोनच पर्याय चर्चेत आहेत. मात्र, जागा वाढवल्यास अराजकता निर्माण होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा : INDIA आघाडीची बैठक संपली! डिलिमिटेशनबाबत खर्गेंचा मोठा दावा; राहुल गांधी 5 वाजता काय बोलणार?
लोकसभेतील जागांची संख्या वाढवणे घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक नाही - बापट
या विधेयकावर आक्षेप घेताना बापट यांनी चार महत्त्वाचे मुद्दे मांडले. महिला आरक्षणाला डिलिमिटेशनशी जोडण्याचे कारण काय, डिलिमिटेशन प्रक्रियेच्या विश्वासार्हतेचा प्रश्न, राज्यसभेतील 250 जागांची मर्यादा आणि त्यामुळे संघराज्य व्यवस्थेला निर्माण होणारा धोका, हे ते मुद्दे आहेत. डिलिमिटेशनची प्रक्रिया घटनात्मकदृष्ट्या आवश्यक असली तरी लोकसभेतील जागांची संख्या वाढवणे घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. घटनेनुसार जनगणना आणि त्यानुसार मतदारसंघांची पुनर्रचना आवश्यक आहे. मात्र, जागांची संख्या 850 पर्यंत वाढवलीच पाहिजे, असे घटनेत कुठेही नमूद नसल्याचे बापट यांनी सांगितले. मतदारसंघांची पुनर्रचना करताना प्रत्येक मतदारसंघातील मतदारांची संख्या साधारणपणे समान असणे अपेक्षित आहे. जात, धर्म किंवा राजकीय पक्षाच्या आधारावर मतदारसंघांची आखणी करता येणार नाही. दरम्यान, डिलिमिटेशन आयोगाच्या निष्पक्षतेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. आयोगावरील नियुक्त्यांमध्ये सरकारचा प्रभाव राहिल्यास प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर परिणाम होऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. आयोगाची रचना अधिक निष्पक्ष आणि विश्वासार्ह असावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार बदल करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे डिलिमिटेशन विधेयकावरून आता घटनात्मक आणि राजकीय पातळीवर चर्चा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT












