INDIA आघाडीची बैठक संपली! डिलिमिटेशनबाबत खर्गेंचा मोठा दावा; राहुल गांधी 5 वाजता काय बोलणार?
डिलिमिटेशन विधेयकावरुन देशातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. यासंबंधी INDIA आघाडीची दिल्लीत बैठक पार पडली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठा दावा केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मतदारसंघ पुनर्रचना विधेयक
बैठकीनंतर खर्गेंचा मोठा दावा
राहुल गांधींची पत्रकार परिषद कधी?
INDIA Bloc Press Conference : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारच्या प्रस्तावित परिसीमन विधेयकावरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. इंडिया आघाडीतील सर्व पक्षांनी एकत्र येत केंद्र सरकारच्या या विधेयकांना विरोध करण्याचा निर्णय घेतल्याचं खरगे यांनी सांगितलं. प्रस्तावित परिसीमन विधेयक लोकशाहीसाठी मोठा धोका असून, या माध्यमातून मोदी सरकार देशातील सर्व सत्ता स्वतःच्या हातात केंद्रित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच हे विधेयक भारतीय संविधानाच्या मूळ रचनेला धक्का पोहोचवणारं असल्याचंही ते म्हणाले.
एससी, एसटी समाजावर अन्याय
या विधेयकामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणजेच एससी आणि एसटी समाजावर अन्याय होणार असल्याचा आरोपही खरगे यांनी केला. संविधानातील कलम 330 चा दाखला देत त्यांनी लोकसभेतील एससी आणि एसटी समाजासाठी राखीव असलेल्या जागा त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाढल्या पाहिजेत, अशी भूमिका मांडली. ताज्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार परिसीमन झाल्यास या समाजांना अधिक जागा मिळू शकतात. मात्र, एससी आणि एसटी समाजाला जास्त प्रतिनिधित्व मिळू नये, अशीच सरकारची भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रस्तावित विधेयकात याबाबत कोणतीही तरतूद नसणं हा या समाजावर अन्याय असल्याचं खरगे म्हणाले.
हे ही वाचा : डिलिमिटेशनवरुन INDIA आघाडीची खलबतं सुरू, राष्ट्रवादीची मात्र माघार; दिल्लीत नेमकं काय घडतंय?
मनुस्मृती आणण्याचा भाजपचा प्रयत्न
दरम्यान, भाजप सरकारला देशातील सत्ता कायमस्वरूपी आपल्या हातात ठेवायची आहे, असा गंभीर आरोपही खरगे यांनी केला. भाजपची महत्त्वाकांक्षा आता 400 जागांचा आकडा पार करण्यापासून 800 पेक्षा अधिक जागा मिळवण्यापर्यंत पोहोचली आहे, अशी टीका त्यांनी केली. लोकशाही आणि संविधान कमकुवत करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू असून, संविधान हटवून मनुस्मृती आणण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच सुमारे 10 कोटी लोकांना प्रक्रियेतून वगळल्यानंतर त्याच प्रक्रियेच्या आधारे परिसीमन करण्याची जबाबदारी देणं चुकीचं असल्याचंही त्यांनी म्हटलं.
हे ही वाचा : 'शरद पवारांसाठी राज्यसभेची जागा सोडली, आता त्यांचा पक्ष भाजपला पाठिंबा देणार..' महाराष्ट्र काँग्रेसची पोस्ट तुफान व्हायरल
राहुल गांधी काय बोलणार?
या संपूर्ण राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते राहुल गांधी काय भूमिका मांडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राहुल गांधी यांची आज (28 नोव्हेंबर) सायंकाळी पाच वाजता दिल्लीतील इंदिरा भवन येथे पत्रकार परिषद होणार आहे. परिसीमन विधेयक, महिला आरक्षण आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर राहुल गांधी या पत्रकार परिषदेत काय बोलणार, तसेच इंडिया आघाडीची पुढील रणनीती काय असणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
