'शरद पवारांसाठी राज्यसभेची जागा सोडली, आता त्यांचा पक्ष भाजपला पाठिंबा देणार..' महाराष्ट्र काँग्रेसची पोस्ट तुफान व्हायरल
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवल्यानंतर देशातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. या सगळ्यात महाराष्ट्र काँग्रेसनं केलेली एक सोशल मीडिया पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मतदारसंघ पुनर्रचना विधेयक
महाराष्ट्र काँग्रेसची पोस्ट तुफान व्हायरल
राष्ट्रवादी शरद पवार गटाला करुन दिली 'ती' आठवण
Maharashtra Congress Viral Post : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवल्यानंतर देशातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. हे विधेयक संमत करुन घेण्यासाठी संसदेत दोन तृतीयांश बहुमताची गरज आहे. या आकड्यांची जुळवाजुळव भाजप कशी करणार याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट या विधेयकाच्या बाजूने उभा राहणार असल्याचे संकेत राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी दिले आहेत. 'डिलिमिटेशन हे संवैधानिक असल्याने ते करावे लागते असे शरद पवार म्हणाले होते' असं जितेंद्र आव्हाड म्हणाले; तर सुप्रिया सुळेदेखील या विधेयकाच्या बाजूने असल्याचं बोललं जात आहे. या सगळ्यात महाराष्ट्र काँग्रेसनं केलेली एक सोशल मीडिया पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. शरद पवार यांना 85 व्या वर्षी राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी उभा राहिला असल्याची आठवण या पोस्टमध्ये करुन देण्यात आली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसची सोशल मीडिया पोस्ट जशीच्या तशी
'शरद पवार साहेबांना वयाच्या 85 व्या वर्षी पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता…
मार्च 2026 मध्ये महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे अवघे 10 आमदार होते. एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी 36 मतांची आवश्यकता होती. काँग्रेसकडे 16, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे 20 आमदार होते.
सुप्रिया सुळे यांनी शरद पवार साहेबांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस नेतृत्वाकडे पाठिंबा मागितला. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी कोणतेही आढे वेढे न घेता सकारात्मक भूमिका घेतली. काँग्रेसने स्वतःच्या जागेवरील दावा बाजूला ठेवत शरद पवार साहेबांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही त्यांना पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीने एकमताने त्यांची उमेदवारी निश्चित केली.
आणि आता काय?
परिसीमन कायद्याच्या पार्श्वभूमीवर तेच शरद पवार साहेब, सुप्रीया सुळे ताई आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष भाजप सरकारला पाठिंबा देणार आहेत.'
हे ही वाचा : माजी CJI गवई यांचे गंभीर आरोप, राष्ट्रपतींना पत्रात काय विनंती केली?
कधी आहे विशेष अधिवेशन?
सरकारने सोमवार, 30 नोव्हेंबर रोजी लोकसभेचे आणि बुधवार, 2 डिसेंबर रोजी राज्यसभेचे अधिवेशन पुन्हा बोलावण्याची विनंती केली आहे. या बैठकांचा उपयोग अत्यावश्यक सरकारी कामकाज पूर्ण करण्यासाठी केला जाईल.
