माजी CJI गवई यांचे गंभीर आरोप, राष्ट्रपतींना पत्रात काय विनंती केली?
माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी न्यायाधीशांच्या नियुक्त्या आणि कॉलेजियमच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. यासंदर्भात त्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांचे राष्ट्रपतींना पत्र
विशिष्ट समाजाला झुकतं माप दिलं जात असल्याचा गंभीर आरोप
B. R. Gavai Letter to President Of India : भारताचे माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियम व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. न्यायाधीशांच्या नियुक्त्या आणि बदल्यांमध्ये पारदर्शकता नसल्याचा तसेच विशिष्ट समाजातीलच उमेदवारांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एका जबाबदार नागरिकासह माजी सरन्यायाधीश म्हणून न्यायव्यवस्थेतील चिंताजनक बाबी राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हे पत्र लिहित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हे पत्र कोणत्याही रागातून किंवा घाईघाईने लिहिलेलं नसून न्यायव्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याच्या जबाबदारीच्या भावनेतून लिहिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
विशिष्ट समाजातील उमेदवारांनाच प्राधान्य
बी. आर. गवई यांच्या म्हणण्यानुसार, सरन्यायाधीश आणि कॉलेजियमचा सदस्य म्हणून काम करताना त्यांनी न्यायाधीशांच्या नियुक्त्यांमध्ये ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्याक आणि खुल्या प्रवर्गातील सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व मिळावं, यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, अलीकडच्या नियुक्त्यांमध्ये गुणवत्ता आणि सर्वसमावेशकतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. एका विशिष्ट समाजातील उमेदवारांना न्यायाधीशपदी नियुक्ती आणि पदोन्नती देताना प्राधान्य दिलं जात असून इतर समाजघटकांना डावललं जात असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. मार्च 2025 मध्ये केंद्रीय कायदेमंत्र्यांनी राज्यसभेत दिलेल्या आकडेवारीचा दाखला देत 2018 पासून नियुक्त झालेल्या 715 उच्च न्यायालयीन न्यायाधीशांमध्ये एससी समाजाचे 22, एसटी समाजाचे 16, ओबीसी समाजाचे 89 आणि अल्पसंख्याक समाजाचे 37 न्यायाधीश असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. तसेच, 2021 ते 2026 या काळातील नियुक्त्यांमध्ये ओबीसी समाजाला लोकसंख्येच्या तुलनेत अत्यंत कमी प्रतिनिधित्व मिळाल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे.
हे ही वाचा : वेदर रिपोर्ट : कुठे जोरदार पाऊस, कुठे कडाक्याची थंडी? अलर्ट बघाच!
बदल्यांमध्येही पक्षपात
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्त्यांमध्येही एका विशिष्ट समाजाला झुकतं माप दिलं जात असल्याचा गंभीर आरोप गवई यांनी केला आहे. देशाच्या लोकसंख्येत पाच टक्क्यांपेक्षाही कमी वाटा असलेल्या एका समाजाचं सर्वोच्च न्यायालयात 40 टक्क्यांपेक्षा अधिक प्रतिनिधित्व असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. याशिवाय, न्यायाधीशांच्या बदल्यांमध्येही पक्षपात होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एका उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची मोठ्या उच्च न्यायालयातून छोट्या उच्च न्यायालयात बदली केल्यानंतर पुन्हा एका प्रमुख उच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती संबंधित न्यायाधीश विशिष्ट समाजातील असल्यामुळे त्यांना दिलेलं बक्षीस असल्याचा आरोप त्यांनी केला. तर दुसऱ्या एका गुणवंत आणि मेहनती मुख्य न्यायाधीशाची केवळ दुसऱ्या न्यायाधीशासाठी जागा निर्माण करण्याच्या उद्देशाने बदली करण्यात आल्याचंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.
हे ही वाचा : मोठी बातमी! NCP शरद पवार गटाकडून भाजप सरकारच्या डिलिमिटेशन विधेयकला पाठिंबा, जितेंद्र आव्हाडांनी केलं जाहीर
केंद्र सरकारचीही भूमिका
भारतीय संविधानाच्या कलम 124(2) नुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीत राष्ट्रपतींची भूमिका महत्त्वाची आहे. कॉलेजियमच्या शिफारशींना महत्त्व असलं तरी त्याची उत्तरदायित्वापासून सुटका होऊ शकत नाही आणि संविधानाचं संरक्षण करण्याची राष्ट्रपतींची जबाबदारीही संपत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. न्यायाधीशांच्या नियुक्त्या आणि बदल्यांमध्ये केंद्र सरकारचीही भूमिका असल्याने सरकार आणि संसदेने न्यायव्यवस्थेत विविधता व सर्वसमावेशकता वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन त्यांनी केलं आहे. त्यामुळे आता राष्ट्रपती या पत्राची दखल घेऊन काही भूमिका घेतात का आणि कॉलेजियमच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणण्यासाठी काही पावलं उचलली जातात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
