बदलापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत! बारावीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Badlapur News : बदलापूर शहरात भटक्या कुत्र्यांची वाढती दहशत आता नागरिकांच्या जीवावर बेतू लागली आहे. शहराच्या पश्चिमेतील शनी नगर परिसरात भटक्या कुत्र्यांच्या भीतीने जीवाच्या आकांताने पळणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ADVERTISEMENT

Badlapur News
Badlapur News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

बदलापूर शहरात भटक्या कुत्र्यांची वाढती दहशत

point

घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

point

12 वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Badlapur News : बदलापूर शहरात भटक्या कुत्र्यांची वाढती दहशत आता नागरिकांच्या जीवावर बेतू लागली आहे. शहराच्या पश्चिमेतील शनी नगर परिसरात भटक्या कुत्र्यांच्या भीतीने जीवाच्या आकांताने पळणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हर्षल शिंदे (वय 17) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा : बीड: प्राध्यापक डॉक्टरकडून मेडिकल विद्यार्थिनीचा लैंगिक छळ; 11 महिन्यांत चार वेळा..

नेमकी घटना काय घडली?

गुरुवारी सायंकाळी क्लास सुटल्यानंतर बारावी सायन्समध्ये शिकणारा हर्षल शिंदे हा आपल्या मित्रांसोबत घरी निघाला होता. शनी नगर परिसरातून जात असताना अचानक भटक्या कुत्र्यांची एक टोळी त्याच्या मागे लागली. कुत्रे चावतील या भीतीने हर्षलने वेगाने धावण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या अवस्थेत त्याने जवळच असलेल्या एका किराणा दुकानात धाव घेतली. मात्र, दुकानात शिरताच काही क्षणांतच तो खाली कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

हर्षल ज्या किराणा दुकानात शिरला, तेथे उपस्थित असलेल्या आजीबाईंनी त्याला सावरण्यासाठी पाणी दिले. मात्र, काही वेळातच त्याने प्राण सोडले. हा संपूर्ण प्रसंग सांगताना आजीबाईंनाही अश्रू अनावर झाले. कुत्र्यांच्या भीतीने हर्षल घाबरून दुकानात धावत येतानाची दृश्ये तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

एका होतकरू आणि अल्पवयीन विद्यार्थ्याचा असा दुर्दैवी अंत झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाकडे आणि नियंत्रणाकडे आधीच लक्ष दिले असते, तर हा जीव वाचला असता का, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

हे ही वाचा : पालघर: ITI च्या 350 विद्यार्थ्यांना वर्षभरापासून पाण्याविना काढावे लागतायत दिवस

 

दरम्यान, या घटनेनंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी लवकरच श्वानप्रेमी, पोलीस अधिकारी आणि पालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत श्वानप्रेमींना आवश्यक सूचना देण्यासह पुढील पावले उचलण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.