पालघर: ITI च्या 350 विद्यार्थ्यांना वर्षभरापासून पाण्याविना काढावे लागतायत दिवस

Palghar News : पालघर जिल्ह्यातील तलासरी येथील कॅप्टन विनायक गोरे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI) विद्यार्थ्यांना वर्षभरापासून पाणी न दिल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.

ADVERTISEMENT

Palghar News
Palghar News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

350 हून अधिक विद्यार्थ्यांना अस्वच्छ पाणी

point

अद्याप ठोस तोडगा नाही

Palghar News : एकीकडे डिजिटल इंडिया आणि स्किल इंडियाच्या माध्यमातून देशातील तरुणांना कौशल्यपूर्ण बनवण्याची स्वप्ने पाहिली जात आहेत; मात्र दुसरीकडे याच कौशल्यपूर्ण भारताची पायाभरणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पालघर जिल्ह्यातील तलासरी येथील कॅप्टन विनायक गोरे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) ही धक्कादायक परिस्थिती आहे. 

हे ही वाचा : बीड: प्राध्यापक डॉक्टरकडून मेडिकल विद्यार्थिनीचा लैंगिक छळ; 11 महिन्यांत चार वेळा..

350 हून अधिक विद्यार्थ्यांना अस्वच्छ पाणी

तब्बल 350 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या या संस्थेत गेल्या वर्षभरापासून पाण्याची समस्या कायम असून, पिण्यासाठी फिल्टरयुक्त पाणी आणि स्वच्छतागृहांमध्येही पाणी उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचा संताप वाढत आहे.   तलासरी ITI मध्ये विविध तांत्रिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दूरदूरच्या गावांतून येतात. मात्र संस्थेत पोहोचल्यानंतर पिण्याचे पाणीही मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना स्वतःच्या खिशातून बाटलीबंद पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. दररोज 10 रुपये पाण्यावर खर्च करणे विद्यार्थ्यांना परवडणारे नाही. त्यातच मुलांच्या आणि मुलींच्या स्वच्छतागृहांमध्ये पाणी नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

अद्याप ठोस तोडगा नाही

या समस्येबाबत विद्यार्थ्यांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रारी केल्या, निवेदने दिली आणि नगर पंचायतीवर मोर्चाही काढला; मात्र अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. गेल्या चार दिवसांपासून कर्मचारी परिसरात ठिकठिकाणी खोदकाम करत असले तरी पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायम आहे.दरम्यान, विद्यार्थ्यांच्या या गंभीर समस्येची दखल घेत माजी आमदार श्रीनिवास वनगा आणि स्थानिक माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांनी प्रशिक्षण संस्थेला भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पाणीटंचाईची पाहणी केली आणि संबंधित प्रशासनाकडे तातडीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.दुसरीकडे, शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही विद्यार्थ्यांच्या पाण्याच्या प्रश्नाकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याची खंत प्रशिक्षण संस्थेकडून व्यक्त केली जात आहे. 

हे ही वाचा : कंपनीतील कामावरुन वाद, कामगाराने सुपरवायजरची केली निर्घृण हत्या, तळेगाव MIDC मध्ये काय घडलं?


"विद्यार्थ्यांनी आंदोलन केले, लोकप्रतिनिधींनी भेट दिली, प्रशासनाकडे पाठपुरावा झाला; मात्र प्रश्न अद्याप सुटलेला नाही," अशी भावना तलासरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गट निदेशक विजय दळवी यांनी व्यक्त केली. वाढवण बंदरासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी स्थानिक तरुणांना कुशल बनवण्याची तयारी सुरू असताना, शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी संघर्ष करावा लागत असेल तर स्किल इंडियाच्या स्वप्नांचा नेमका उपयोग काय, असा सवाल उपस्थित होत आहे. आता तरी प्रशासन जागे होऊन 350 विद्यार्थ्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.